पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. आता यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आम्ही विनंती केली आहे. जर, त्यांनी ती मान्य केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ.
आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, पॅटर्न लागू करण्याची घाई करू नये, अभ्यास करण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा वेळ द्यावा, नवा अभ्यासक्रम युपीएससीच्या धरतीवर असल्यामुळे त्याची पुस्तकं उपलब्ध नसल्याने त्यात सुधारणा व्हावी, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.
पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन सुरु आहे. सोमवारी काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होतं. गेल्या दोन महिन्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हे तिसरे आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन तीन आठवडे झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
म्हणून विद्यार्थी आक्रमक
कोरोनामुळे दोन वर्षे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अशात परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संतापले होते. पण पुढे सरकारने नवा पॅटर्न लागू करण्याची घोषणा केल्याने विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले. यासाठी सरकारने घाई करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
निवडणुकीला येणारे नेते
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांची पोटनिवडणूक सध्या होत आहे. त्यानिमित्त प्रचारासाठी विविध पक्षांचे नेते सध्या पुण्यात येत आहेत. याचनिमित्ताने या विद्यार्थी आंदोलकांना भेटण्यासाठीही नेते येत आहेत. त्यातील काही पाठिंबा देत आहेत तर काही जण सरकारशी पाठपुरावा करण्याची ग्वाही देत आहेत.
फडणवीस नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडिओ
राज्य सरकारने अत्यंत तत्परतेने निर्णय करून एमपीएससीला कळवले होते की 2025 पासून नवा सिल्याबस लागू करा.
विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन सिल्याबसला नाही. 2025 पासून लागू करा एवढेच मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा.. pic.twitter.com/HPzjnXbjps— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 21, 2023
DYCM Devendra Fadnavis on MPSC Student Agitation