नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन काल सायंकाळी आटोपले. त्यानंतर आज पहाटेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्र्यंबकरोडवर असलेल्या पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२२ (सरळ सेवा) दीक्षांत संचलन सध्या सुरू आहे. या सोहळ्याला फडणवीस उपस्थित आहेत. सकाळी ८ वाजता या समारंभाला प्रारंभ झाला आहे.
पोलिस दलात दाखल होणाऱ्या पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी पोलीस उपनिरीक्षकांची एक तुकडी सेवेसाठी सज्ज होते. एमपीएससीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याठिकाणी वर्षभराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर दीक्षांत सोहळा संपन्न होतो. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झालेल्या बॅचचा दीक्षांत सोहळा सध्या सुरू आहे. ४९४ पोलीस उपनिरीक्षकांची ही तुकडी आहे. यात ३९४ पुरुष आणि १४५ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. या समारंभानंतर हे सर्व पीएसआय सेवेत दाखल होणार आहेत. प्रबोधिनीतील मुख्य कवायत मैदानावर दीक्षांत सोहळा होत आहे.
यंदाच्या तुकडीचे वैशिष्ट्य म्हणजे ८८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर तर १३ टक्के पदव्युत्तर आहेत. प्रशिक्षण काळात या प्रशिक्षणार्थींना भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा, स्थानिक व विशेष कायदे, न्यायवैद्यक शास्त्र सायबर क्राईम गुन्हेगारी शास्त्र तसेच कवाय शस्त्र कवायत शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार, सराव योग, सायबर गुन्हे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण काळात वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचाही सन्मान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीक्षांत सोहळ्यात केला जाणार आहे.
बघा, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
विकासकामांचे भूमीपूजन
दीक्षांत सोहळ्यानंतर प्रबोधिनीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी पावणेदहा वाजता प्रबोधिनी इमारत, मोटार परिवहन इमारत, प्रबोधिनीचे मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंत यांचे भूमिपूजन गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई उपस्थित राहणार आहेत.
DYCM Devendra Fadnavis Nashik Police Academy
Ceremony PSI MPA Maharashtra