मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ज्या योजनांचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. ही विकासाची बदललेली संस्कृती आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “अडीच वर्षांपूर्वी आपल्यासोबत विश्वासघात झाला. पण, बाळासाहेबांचा सच्चा पाईक असलेल्या एकनाथ शिंदेंनी हिम्मत दाखवली आणि राज्यात डबल इंजिन सरकार आलं.” हे वाक्य उच्चारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टाळ्या वाजविल्या. फडणवीसांचा रोख हा उद्धव ठाकरेंवर होता. आणि त्यालाच दुजोरा देत मोदींनी टाळ्या वाजविल्या. त्यामुळे ही बाब सभेच्या ठिकाणी आकर्षणाची आणि चर्चेही ठरली.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. धारावी येथील एक लाख लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारने रेल्वे विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
DYCM Devendra Fadnavis in Modi Sabha Politics