नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाण्यातील दुर्दैवी घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सरकारी रुग्णालयात सर्वसामान्यांचे हाल होताना सारेच बघतात, मात्र आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असताना देखील आपल्या मनातील भावना स्पष्टपणे बोलून दाखविल्या आहेत.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. त्यावेळी शासकीय रुग्णालयांची अवस्था बघून टेंशन येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. सरकारी रुग्णालयांची स्थिती बदलणे, येथील चित्र पूर्णपणे बदलणे हे सरकारपुढे एक मोठे आव्हान आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. रुग्णालयात पारदर्शी कारभार आवश्यक आहे, असे ते म्हणाले. खासगी रुग्णालयात मिळतात तसे उपचार सरकारी रुग्णालयात मिळत नाहीत. मला दर्जेदार काम हवे. जर तसे काम झाले नाही, तर मला कंत्राटदारांना वेगळे इंजेक्शन मला द्यावे लागेल, या शब्दांत त्यांनी ठेकेदारांना इशारा दिला. कंत्राटदार कोण आहे, हे आपण कधीही बघत नाही. पैसा कितीही लागला तरी चालतो, पण काम पारदर्शी हवे. कामात कुठेही तडजोड मला चालत नाही, असेही त्यांनी सांगितले.
माझा जन्म इथलाच
मेडिकलमधील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपला जन्म याच महाविद्यालयात झाल्याचे सांगितले. नागपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी नागपूर आहे. माझा जन्म याच शासकीय रुग्णालयात झाला आहे. मला कोविड झाला, त्यावेळी देखील मी एका शासकीय रुग्णालयातच दाखल झालो आणि बरा झालो. जे उपचार आमदार-खासदारांना मिळतात तेच सर्वसामान्यांना मिळायला हवे, अशी असेही ते म्हणाले.
मानसिकता बदला
शासकीय रुग्णालये चांगली असली पाहिजे. गरीब रुग्णांना कसेही उपचार दिले तरी चालतात, ही मानसिकता आता बदलायला पाहिजे. डॉक्टरांमध्ये संवेदना असली पाहिजे, गरिबांना उत्तम उपचार दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
DYCM Devendra Fadnavis Government Hospital Work Condition
Nagpur Thane Kalwa Patient Death