गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्या नजिक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा उत्साह वाढविला. त्यांचा सत्कारही केला.
दुपारच्या सुमारास त्यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. प्रारंभी दामरंचा आणि नंतर ग्यारापत्ती या दोन्ही ठिकाणी त्यांनी पोलीस इमारतींचे उद्घाटन केले. दामरंचा हा गडचिरोलीचा अहेरी तालुक्यातील दक्षिणी भाग, तर ग्यारापत्ती उत्तर गडचिरोलीतील, थेट छत्तीसगडच्या सीमेवर. काल ३ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, ते ठिकाण दामरंचा येथून ७-८ कि.मी. अंतरावर. आज त्याच भागात देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. आपले जवान धोका पत्करुन काम करतात. त्यांचे मनोबल वाढविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे, हाच त्यामागचा दुहेरी उद्देश. ग्यारापत्ती हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव, तेथूनच छत्तीसगड सुरु होते. पण, पुढे ३५ कि.मी.पर्यंत कोणतेही पोलीस स्थानक नाही.
अतिसंवेदनशील भागात साधारणत: आमदारांच्या पलिकडे कुणी भेटत नाही, तेथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला. एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांकडून विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी महिलांना अर्धे तिकिट आणि लेक लाडकी या योजनांचे महिलांनी स्वागत सुद्धा केले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीस यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील एकलव्य सभागृहात त्यांनी सी-६० च्या जवानांचा सत्कार केला. या नूतन सभागृहाचे सुद्धा उद्घाटन केले. दादालोरा खिडकी या नावाने एक योजना गडचिरोली पोलीस राबवित असून, शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम गडचिरोली पोलीस करीत आहेत. या योजनेशी प्रशंसा करतानाच काही लाभांचे वितरण या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Yesterday there was an encounter of naxalites, and today I reached this sensitive area at Chhattisgarh border.
This is Maharashtra's last village. Our police have cracked down on maoists really well. It is my responsibility to boost their morale and honour them.
काल जिथे चकमक… pic.twitter.com/6ShLCkRv3b— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 1, 2023
नक्षलवाद ही देशविरोधी लढाई…!
नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे. त्यामुळेच एकिकडे या समस्येविरोधात लढणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. गडचिरोलीत यापूर्वीही मी दोन वेळा मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करणार आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले.
आज शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरजागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही त्यांनी सांगितले.
DYCM Devendra Fadnavis Gadchiroli Border Visit