नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून विदर्भात तर पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही, तर दुसरीकडे राज्यातील राजकारणाचे वारे देखील जोरदारपणे वाहतच आहेत, त्यामुळे सत्तासंघर्ष, बैठका, आरोप प्रत्यारोप, राजकीय डावपेच असे सर्व प्रकार देखील थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची आज सकाळी संघ मुख्यालयात भेट घेतली आहे.
सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकसाठी मतदान पार पडले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. येथील महापूर आणि पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांना भेट देण्यासाठी ते विविध जिल्ह्यात फिरत आहेत. दरम्यान, नागपूर येथे दाखल होतच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली, त्यामुळे या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्कविर्तकांना उदाण आले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीही अधिक माहिती दिली नाही.
केवळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंची भेट घेण्याची प्रथा असून त्या दिवशी मोहन भागवत यांची भेट घेऊ शकलो नाही, म्हणून आज भेटलो एवढेच स्पष्ट केले. मात्र या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून त्यांच्या 45 मिनिटांच्या भेटीत नेमके काय खलबते झाली याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कदाचित सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असावी, इतकेच नव्हे तर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर देखील चर्चा झाली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे १२ खासदार पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले आहेत. त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवानाही झाले आहेत. त्याचवेळी नागपुरात आलेले देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला पोहचले. उपमुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच ते संघ मुख्यालयात दाखल झाले असून ते भागवतांची भेट घेत आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी, शिवसेनेत झालेले बंड, भाजपा पक्षश्रेष्ठी याबाबत फडणवीस आणि भागवतांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीतून घडलेले आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर, सरसंघचालकांचे आशीर्वाद घेण्यासाठीही ही सदिच्छा भेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यादरम्यान अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या महिनाभरात झालेल्या राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानण्यात येते आहे.
केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला. या सरकारमध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा नव्हती. मात्र ऐनवेळी त्यांना केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागले. याबाबतही आजच्या भागवतांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेत आलेले नवे शिवसेना-भाजपा सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. अशा स्थितीत या सरकारची आगामी वाटचाल काय असू शकेल, याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
DYCM Devendra Fadanvis Meet RSS Chief Mohan Bhagwat in Nagpur