ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. फडणवीस हे राज यांच्या शीवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मनसेचा समावेश करून अमित ठाकरे यांना मंत्री केले जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात ही भेट आहे का, अशीही अटकळ बांधली जात आहे.
शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराने भाजप-शिंदे गट असलेल्या शिवसेनेच्या समर्थनार्थ मतदान केले होते. तत्पूर्वी बुधवारी दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आले. आज अखेर ती संधी चालून आली. दोन्ही नेत्यांची भेट झाली असून त्यात राजकारणावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
याप्रसंगी श्री राज ठाकरे जी आणि सौ. वहिनींनी केलेल्या सत्काराबद्दल मी दोघांचाही नितांत आभारी आहे.#Maharashtra pic.twitter.com/NcUJNDNeSa
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) July 15, 2022
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला नेस्तनाबूत करून एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली. शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात बंडखोर भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेऊ असे ते म्हणाले. यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. त्यात फडणवीस-राज भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपने अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची ऑफर दिल्याची चर्चा सध्या जोरात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचा खुलासा करताना ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक ही बातमी पसरवून वातावरण निर्माण करत आहे, असे ते म्हणाले.
DYCm Devendra Fadanvis And MNS Chief Raj Thackeray Meet today