मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ नये, त्यांना कर्ज मिळावे, यासाठी सर्व संबंधित बॅंकांना सूचना देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचेसह विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३२.८२ लाख पात्र कर्ज खाती असून आधार प्रमाणिकरण झालेल्या ३२.२९ लाख कर्जखात्यांपैकी ३१.७१ लाख कर्जखात्यांना २० हजार २५० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहकारमंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले. आधार प्रमाणिकरण झालेले नसल्याने काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर काही बॅंकांचे राष्ट्रीयकृत बॅंकांत विलिनीकरण झाल्यामुळे अडचणी आल्याचे सांगून या योजनेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही तालुक्यातून बोगस प्रकरणे झालेली नाहीत असे निदर्शनास आलेले आहे, असे स्पष्ट करुन पीककर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
सौर कृषिपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार
सौरकृषिपंपांच्या देखभाल-दुरुस्ती मार्गदर्शनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना सौरकृषि पंप वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी वाशिम जिल्ह्यातील औरंगपूर येथे मुख्यमंत्री कृषिपंप योजनेंतर्गत बसविण्यात आलेले सौरपंप नादुरुस्त असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी उत्तर दिले. औरंगपूर येथील श्रीमती सिंधुबाई भगत यांनी त्यांच्या शेतात मे. स्पॅन पंप्स, पुणे या कंपनीद्वारे बसविलेल्या सौरकृषिपंपाबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीचे निराकरण देखील कंपनीद्वारे करण्यात आले होते, त्यानंतर श्रीमती भगत यांनी त्यांच्या सौरकृषिपंपाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी या पंपाची तपासणी केली असता स्प्रिंक्लरवर लावलेले पाईप हे व्यवस्थित न बसवल्याने पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले, ते व्यवस्थित करुन देण्यात आलेले असून श्रीमती भगत यांनी त्यांच्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे, असे सांगून ऊर्जा राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सौरकृषिपंप वापराची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मेळावे घेतले जातील, तसेच आगामी येऊ घातलेल्या ‘कुसुम’ योजनेतूनही माहिती दिली जाईल, असे सांगितले.