नाशिक – जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जातांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून आरोग्याची काळजी घेण्याचे भान कोरोनामुळे आपणास आले आहे. कोरोनाच्या संकटाला सामोरे जावून त्यावर मात करण्याकामी प्रशासनाच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना तसेच खरीप हंगाम आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा रशिद शेख, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, ॲड राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या नियमित उपस्थितवर लक्ष केंद्रीत करून दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था होईल याचे नियोजन करण्यात यावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य व पोलिस विभागांनी मनुष्यबळ उपलब्धतेसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात यावी. कोरोनाचा हा काळ अतिशय बिकट असल्याने ग्रामीण भागात सेवा देतांना मानवतेच्या भावनेतून शासकीय डॉक्टरांनी काम करावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरीकांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करता संभाव्य तिसऱ्या लाटेत 30 च्या आतील वयोगटातील नागरिक तसेच बालके बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादृष्टिने प्रत्येक तालुकास्तरावर बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर पोलिस विभागाने कडक कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. पवार यांनी दिल्या आहेत.
कोरोना काळात सर्वांचे काम कौतुकास्पद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तिव्रता कमी झाली असली तरी सध्या रुग्णसंख्या 2500 वर स्थिर असल्याने अजूनही आपली चिंता पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यामुळे सर्वांनीच याकाळात काळजी घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात जिल्हास्तरावर ऑक्सिजन निर्मीती, बेडस् उपलब्धता, प्रयोगशाळांची निर्मीती अशा अनेक कायमस्वरूपी आरोग्य सुविधांची निर्मीती करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्तपद असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.
सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात कोरोनाची सुयोग्य हाताळणी
जिल्ह्यातील सद्यस्थिती व कोरोना उपाययोजनांची माहिती सादर करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यात 7 हजार 500 वरून आज रुग्णसंख्या 2 हजार 473 वर आली असून ॲक्टीव पेशंटबाबत राज्यात जिल्ह्याचा 12 वा क्रमांक आहे. तसेच काही दिवसांपूर्वी 41 टक्के असलेला पॉझिटीव्हीटी रेट आता 2.40 टक्के असून नाशिक जिल्हा राज्यात 16 व्या क्रमांकवर आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा मृत्यु दर 1.85 टक्के आहे. राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर कमी असुन जिल्हा राज्यात 25 व्या क्रमांकावर आहे. तसेच म्यूकर मायकोसिसच्या 685 एकुण बाधित रुग्णांपैकी 444 रुग्ण बरे झाले असून 65 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच 423 रुग्णांवर मोठी शस्त्रक्रीया करण्यात आली असून 176 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. याप्रमाणे बालरुग्णांसाठी देखील टास्कफोर्स करुन तिसऱ्या लाटेच्या संदर्भात पुर्वतयारी सुरु करण्यात आलेली आहे.
तसेच जिल्ह्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता जवळपास 100 मेट्रीक टनने वाढवलेली आहे. सध्या 167 मेट्रीक टनपर्यंत उत्पादन होवु शकते लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि सिलेंडर या माध्यमातून पुढील लाटेचा प्रभावी मुकाबला करण्याचे दृष्टीने प्रशासन सतर्क आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी बैठकीत दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा रशिद शेख, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, ॲड राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, सहायक प्रकल्प व्यवस्थापक राकेश वाणी, तंत्र अधिकारी जितेंद्र शहा आदि उपस्थित होते.
बियाणे, खते बीएपीच्या उपलब्ध साठ्याची माहिती जाणून घेतांना मंत्री श्री. पवार म्हणाले, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील मागणीच्या तुलनेत पुरेसा खते व बियाण्याचा साठा उपलब्ध असतांनाच बफर स्टॉक केल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची टंचाई भासणार नाही. कृषी संजीवनी मोहिमेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या संशोधनासह तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत चांगले काम झाल्याचे मंत्री श्री.पवार यांनी नमूद केले.
पिककर्ज वाटपाचा नियमीतपणे आढावा घेवून उद्दीष्टपुर्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. जिल्हा बँकेला दिलेल्या 535 कोटी कर्ज वाटपाचा लक्षांक पुर्ण करावा. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील पिककर्ज वाटपासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री पवार यांनी केले.
या वर्षी पीक कर्ज वाटपामध्ये आदिवासीबहुल तालुक्यांना देखील योग्य प्रमाणात कर्ज वितरण होईल याची विशेष दक्षता घेत असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले मागील वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत 17 कोटी रुपये अधिक कर्ज वितरण या तालुक्यांना झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन 30 सप्टेंबर अखेर जिल्ह्याचा पिक कर्जाचा लक्षांक पुर्ण करण्यासाठी. पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल असे श्री मांढरे यांनी सांगितले.