-
कचरा मुक्त, पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ
-
पुणे जिल्हा परिषदेचा शिवराज्यभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यस्तरावर
-
कचरामुक्त जिल्हा अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबविणार
-
घनकचरा व्यवस्थापनासाठी पंधराव्या वित्त आयोगाकडून गावांसाठी निधीची तरतूद
पुणे – शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबविण्यात येणार आहे. अभियान गावागावात घराघरात पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले असून राज्यात आणि देशात या मोहिमेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.
शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी सभागृह पुणे जिल्हा परिषद येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे), जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज राज्यभर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनविण्यासाठी एकजूटीने व एकदिलाने काम करावे. कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान आपण सुरु केले आहे हे अभियान पुणे जिल्हयाच्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक विकासाला बळ देईल. छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ मॉसाहेबांनी वसवलेल्या पुण्याचा गौरव वाढविण्याचा काम करेल, याची मला खात्री आहे.
सन 2016 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याचा ठराव केला होता. आज तोच शिवराज्यभिषेक दिन राज्यस्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. ही जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बाब आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारत आहोत. ही गुढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पताका आहे. अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची आहे.
राज्याला, देशाला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातून आपल्याला राज्याला, देशाला बाहेर काढायचे आहे. सध्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा राज्य शासनाने जाहीर केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक गावात तीस तीस बेडची कोरोना सेंटर उभारत आहोत. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाप्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिवस्वराज्य सुंदरग्राम अभियान, महिलांना सन्मान देण्यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिला धोरणांबाबत राज्य नेहमी अग्रेसर आहे. मुलींना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु केली आहे.
माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जिल्हयाने विविध अभियानात चांगली कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे कचरामुक्त, गावस्वच्छता, नालेसफाई, एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेमध्येही जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेजारील गावांची कचरा समस्याबाबत महापालिका आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्हा परिषदेने चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन. जिल्ह्याच्या आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी केंद्रातून निधी आणि विविध योजना आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहू. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य दिनी जिल्हा परिषदेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्य हे महत्वाचे असून त्यामुळे कचरामुक्त गाव, कचरामुक्त जिल्हा होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कचरामुक्त पुणे जिल्हा अभियानाबाबत माहिती दिली. शोषखड्डे, उपयुक्तता व नियोजनाबाबत तालुका भोर येथील वाठार हिमा गावचे सरपंच संदीप खाटपे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत तालुका बारामती येथील जळगाव सुपेचे सरपंच श्रीमती कौशल्या खोमणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पंचायत समिती शिरुरच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन करुन गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.