नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र्य युनिटची स्थापना करण्यात आली आहे. निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे चार अधिकारी आणि तीस अंमलदार या ठिकाणी तीन सिफ्ट मध्ये कामकाज पाहणार आहेत. स्वतंत्र युनिटमुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
महामार्गासह नाशिक पुणे मार्गास जोडणा-या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाढत्या वाहतूकीमुळे मुंबई पुणे सदृष्य परिस्थिती या ठिकाणी कायम असते महापालिका आणि वाहतूक शाखेकडून अनेक वेळा उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी पोलीसांसाठी येथील वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार येथे होणा-या कोंडीची समस्या टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने येथील सर्कल काढण्यात आले. मात्र तरीही या ठिकाणची परिस्थीती जैसे थे आहे. त्यात वाहनचालकांच्या बेशिस्तीचे दर्शन येथे नित्याचेच झाल्याने वाहतूक कोंडी होण्यास भर पडत आहे. वाहतूक शाखेची तुटपुंजी कर्मचारी संख्येमुळे या ठिकाणी कुणाचा धाकच नसल्याचा अनुभव येत आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त करीत थेट वाहतूक शाखेवरच खापर फोडल्याने येथे वाहतूक पोलीसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखेच्या युनिट २ अतंर्गत द्वारका सर्कल या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी २ शिफ्ट मध्ये १ अधिकारी व नऊ अंमलदार नेमण्यात येत होते. परंतू सदर मनुष्यबळ तेथील रहदारीपुढे तुटपुंजे ठरत होते. त्यामळे वाहतूक व रहदारी नियमनाकरीता स्वतंत्र द्वारका युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटमध्ये एक निरीक्षक एक सहाय्यक निरीक्षक दोन उपनिरीक्षक ३० अंमलदार नेमण्यात आले आहे. सदर अधिकारी कर्मचारी सकाळी ८ ते २, २ ते रात्री ९ व रात्री नऊ ते १ या प्रमाणे तीन सिफ्टमध्ये कामकाज पाहणार आहेत. एका शिफ्टमध्ये एक अधिकारी व दहा कर्मचारी याप्रमाणे नियमीतपणे वाहतूक नियमन करणार आहेत. द्वारका युनिटच्या प्रभारी पदी निरीक्षक दिनकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सोबत सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील, उपनिरीक्षक शिंदे व पठाण कामकाज पाहणार आहेत. द्वारका सर्कल कामकाज तपासणी करीता स्वतंत्र दोन पोलीस निरीक्षकही नियुक्त करण्यात आले आहे.