नवी दिल्ली – शरीरसंबंध स्थापित करताना जोडीदाराच्या सहमतीशिवाय कॉन्डम हटविली जाणारी कृती बेकायदेशीर असेल, असा कायदा अमेरिकेच्या कॅलेफोर्नियामध्ये मंजूर झाला आहे. अशा घटनांमध्ये न्यायालयीन खटला दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असा कायदा करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे, तर जगातील पहिले राज्य ठरले आहे. कायदा मंजूर झाल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
कॅलिफोर्नियामध्ये स्टिल्थिंगला (चोरी) बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. या कायद्यासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. अशी कृती करणे अवैध आणि अनैतिक आहे हे सुनिश्चित करावे लागेल, असे दीर्घकाळ लढा देणार्या क्रिस्टिना गार्सिया यांनी विधानसभेत सांगितले होते. गार्सिया या २०१७ पासून डेमोक्रॅटिक असेंबलीमध्ये अशा प्रकारचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले असून, कायदा मंजूर झाला आहे.
गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. तत्पूर्वी कॅलिफोर्नियाच्या आमदारांनी ७ ऑगस्टला हे विधेयक गव्हर्नर न्यूसम यांच्याकडे पाठविले होते. या कायद्याअंतर्गत गुन्हेगारी संहितेत कोणताही बदल केलेला नाही. देहविक्रय व्यवसायातील महिलांनाही या कायद्याअंतर्गत न्यायालयीन लढा देता येणार आहे.
कायद्यातील तरतुदी
या कायद्यानुसार, शारिरीक संबंधादरम्यान सहमती नसताना कॉन्डम हटविणार्या आरोपींवर नागरी संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये पीडिता भरपाईसाठी न्यायालयीन खटला दाखल करू शकते. परंतु आरोपीला इतर कोणतीही शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली नाही.
वाद आणि चर्चा
या कायद्यात दंड संहितेचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. या कृतीचा बलात्कार किंवा लैंगिक शोषणाच्या श्रेणीत ठेवण्याची गरज आहे. अशा घटनांमुळे महिलांमध्ये शारिरीक संबंधांतून होणारे आजार आणि गर्भवती होण्याचा धोका कायम राहतो, असे गार्सिया यांनी म्हटले आहे. या कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात, असे अनेकांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, पीडितेला शारिरीक संबंधादरम्यानची ही कृती कशी झाली हे सिद्ध करताना अनेक अडचणी येऊ शकतात.