नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात भारताला अत्यंत मौल्यवान कलाकृती मिळाल्या आहेत. अमेरिकेने हा ऐतिहासिक ठेवा मोदी यांच्याकडे सोपविला आहे. भारतीय मालकीच्या या कलाकृती अमेरिकेकडे होत्या. त्या आता सन्मानपूर्वक भारताला देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान अमेरिकेकडून १५७ कलाकृती भारताला परत करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने या मौल्यवान वस्तू परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बेकायदेशीर व्यापार आणि सांस्कृतिक वस्तूंची चोरी रोखण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे.
एकूण १५७ कलाकृतींमध्ये इसवी सन १० मध्ये वाळू-दगडामध्ये तयार केलेल्या दीड मीटर बेस रिलीफ पॅनल्सपासून ८.५ सेमी लांब कांस्य नटराज मूर्तीपर्यंत खूप मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यापैकी बहुतेक वस्तू ११ व्या ते १४ व्या शतकापर्यंतच्या ऐतिहासिक कलाकृती आहेत. त्याच वेळी, साधारणतः ४५ कलाकृती या प्राचीन काळाच्या आहेत. तसेच मूर्ती आणि शिल्पांशिवाय इतर अनेक ऐतिहासिक कलाकृतींचा यात समावेश आहे.
अमेरिकेतून प्राप्त झालेल्या सुमारे ७१ कलाकृती सांस्कृतिक प्रकारच्या आहेत. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित अर्ध्याहून अधिक मूर्ती आहेत. या मूर्ती धातू, दगड आणि टेराकोटाच्या माध्यमातून बनवण्यात आल्या आहेत. तर कांस्य कलाकृतींपैकी लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णू, शिव पार्वती आणि २४ जैन तीर्थंकरांच्या प्रसिद्ध आसनांची अलंकृत शिल्पे आहेत. तसेच ब्रह्मा, रथासह सूर्य आणि विष्णू या तीन प्रमुखांसह हिंदू धर्मातील धार्मिक शिल्पांचा यात समावेश आहे.