सूरत (गुजरात) – दक्षिण गुजरात ते नाशिकपर्यंत पसरलेल्या बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणाचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आली आहे. त्यांना न्यायालयाने १९ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. ग्रामीण भागात खऱ्या नोटांमध्ये बनावट नोटा मिसळून मोठा गोरखधंदा उभा करण्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
गुजरातच्या सीमेवरून हरिदास ऊर्फ हरेश चौधरी, कृतेश ऊर्फ अजय बोचल, भगवंता ऊर्फ भगवान डंबाळे, जयसिंग वळवी या फरारी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापून ते चलनात आणल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती.
असा चालायचा गोरखधंदा
यातील संशयित अजय बोचल आणि हरेश चौधरी खर्या नोटा स्कॅन करून त्यात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून थोडा बदल करून बनावट नोटा छापत असे. त्या नोटा वळवी आणि डंबाळे यांच्याकडे त्या चलनात आणण्यासाठी देत असे. या नोटा बाजारात खपविण्यासाठी संशयितांनी साखळी तयार केली होती. काही नोटा स्वतःजवळ ठेवून इतर नोटा बाजारात पसरवून देत असे. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये संशय येऊ नये म्हणून खऱ्या नोटांमध्ये काही बनावट नोटा मिसळवून संशयितांकडून हा गोरखधंदा सुरू होता. संशयितांकडून ३०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
खरे सूत्रधार
चौधरी आणि बोचल हे दोघेही या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत आढळले आहे. बोचलचे शिक्षण बी.एससी. पर्यंत झाले असून तो प्रिंट काढण्याचे काम करत असे. चौधरीविरोधात यापूर्वीही वघई आणि सापुतारा पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. दोघांनीही झटपट पैसा कमाविण्यासाठी या हे रॅकेट सुरू केले होते.