विशेष प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन गळती घटनेला महिना उलटत नाही तोच नाशिकरोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास या हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्कीटमुळे एक व्हेंटिलेटर जळाले आहे. तर, ४ व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. तत्काळ प्रसंगावधान राखत डाॅक्टर आणि कर्मचा-यांनी रुग्णांना इतरत्र हलविले. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. याबाबत वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्वर यांनी माहिती देतांना सांगितले की, हॉस्पिटलमधील रुद्णांवर सुरळीत उपचार सुरू आहेत. शॉर्टसर्कीटच्या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
महापालिकेचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल मधील आय.सी.यु.कक्षात १६ व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी एका व्हेंटिलेटरमधून शॉर्टसर्किटमुळे धूर निघाला. त्यामुळे तेथील एकूण ४ व्हेंटिलेटर बंद पडले. हे लक्षात आल्यावर त्वरित याच कक्षातील रुग्णसेवक व डॉक्टर यांनी व्हेंटिलेटर असणार्या रूग्णांना ऑक्सिजनवर घेऊन स्टॅबिलाईझ केले. शॉर्टसर्किट झालेले व्हेंटिलेटर व इतर तीन व्हेंटिलेटर एक एक करून सुरू करण्यात आले आहेत. त्यावरील रुग्ण स्थिर असल्याचेही डॉ. नागरगोजे यांनी स्पष्ट केले आहे.