नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी न केलेल्या वाहन क्रमांकाचा वापर करुन बोलेरो पिक अप हे वाहन अक्कलकुवा परिसरात वापरण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे वाहनाचा वायुवेग पथकाद्वारे शोध घेऊन वाहन क्रमांक एम.एच.39 सी 0123 हे वाहन अक्कलकुवा पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आले आहे.
याबाबत संगणक प्रणालीवर शोध घेतला असता अज्ञात व्यक्तीद्वारे कार्यालयाबाहेर या वाहनाची डाटा एन्ट्री करुन बुलढाणा येथे या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र छपाई करण्यात आल्याचे व त्यानंतर सदरचे वाहन अक्कलकुवा येथील व्यक्तींस विक्री केल्याचे आढळून आले आहे. शासकीय अभिलेखात बेकायदेशिररीत्या फेरफार केल्याबाबत कार्यालयामार्फत सायबर गुन्हे शाखा, नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पद्धतीने या कार्यालयामार्फत जारी न केलेल्या एकूण 83 वाहन क्रमांकाचा वापर करुन बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन प्रणालीवरील मोबाईल क्रमांकावरुन शोध घेतला असता तसेच जप्त केलेल्या वाहनाच्या मालकाकडून चौकशी केली असता संबंधित एजंट विरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
Dublicate Vehicle Number Crime FIR Registered