डॉ. उज्वला सुधीर उल्हे, नाशिक
आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती व वातावरण सुध्दा खूप आल्हाददायक होते. त्यातच आज माझा वाढदिवस असल्यामुळे मी खूप आनंदी असून वयाची ६० वर्ष आज पूर्ण केली आहेत. घरच्यांनी मोठा कार्यक्रम करायचे ठरवले व त्यानुसार आज माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, याचा विशेष आनंद आहे, या विशेष आनंदाचे कारण असे की, मला अजून तरी कुठलाही आजार नाही त्यासाठी पथ्य पाणी तर आहेच, त्याचसोबत आणि त्याहून महत्वाचे म्हणजे माझे आई वडील यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. माझ्या आईवडिलांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी बालपणापासून मला ज्या पद्धतीने वाढवले व माझ्यावर संस्कार केले, त्यासाठी शब्दात सांगणे कठीण आहे.
माझे आई वडील माझ्या सोबत असतात. आजच्या काळातही आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. त्यामध्ये माझे काका आणि त्यांचा परिवार, आमचा परिवार असे एकूण आम्ही पंधरा जण एकत्र राहतो. कुणीही कुणाच्या कामात ढवळा ढवळ करीत नाही परंतु आमच्या पैकी कुणीही अडचणीत आहे म्हंटले तर संपूर्ण परिवार एकत्र येऊन त्यावर उपाय शोधून काढतो. अजूनही आमच्या आत्या, बहिणी सर्व येतात तेव्हा त्यांना इथे आले की त्यासुद्धा इथल्या वातावरणात रमून जातात. यासर्व गोष्टी मागे आहेत आमचे आजी आजोबा. ते केव्हाच आम्हाला सोडून देवाघरी गेले पण त्यांचे
संस्कार अजूनही आमच्या सर्वांमधून ओसंडून वाहत असतात असा कधी कधी भास होतो. त्यात भर म्हणजे आम्ही बालपणापासूनचे दहा मित्र अजूनही एकमेकांशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे तो अडचणीमुळे डिप्रेशन मध्ये गेला असे आतापर्यंत तरी झाले नाही. कारण रोज रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही पंधरा ते वीस मिनिटे भेटतो. त्यात घरापासून ते आपल्या व्यवसाय, व्याप या सर्व गोष्टींवर चर्चा होते. तो वेळ कसा भरून निघतो ते कळत नाही. त्याच बरोबर पंधरा दिवसातून एकदा आम्ही सायकल वारी ला निघतो. या ट्प्पामध्ये आम्ही कविता, कथा, गाणी या सर्व
गोष्टींचा वापर करतो त्यामुळे व्यायाम, याच सोबतच डोक्याला खाद्य मिळते.
हे खाद्य पंधरा दिवसासाठी पुरेसे असते. असेच एकदा आम्ही इगतपुरी पर्यंत सायकल वारीला निघालो असतांना रस्त्याच्या कडेला आम्हाला एक कार उभी असलेली दिसली व त्यात एक आजी बसलेल्या होत्या व त्यांना खूप धाप लागली होती. जाणारा येणारा प्रत्येक जण बघत होता परंतु पुढे लवकर जाण्याच्या घाईने म्हणा किंवा आपल्याला ही ब्याद नको, पोलिसांचा ससेमिरा लागेल म्हणा, पण कुणीही थांबत नव्हते. गाडीचा ड्राईव्हर आपल्या परीने बरेच प्रयत्न करीत होता. आम्ही त्यांच्या गाडीपर्यंत पोहचलो व काय मदत करता येईल हे बघत होतो. आमच्यातील एकजण डॉक्टर होता. त्याने लगेच प्रथमोपचार करायला सुरुवात केली, तोपर्यंत बाकीच्यांनी ऍम्ब्युलन्स बोलवली. तेव्हा लक्षात आले की, या आजी म्हणजे
आपल्याला शिकविणाऱ्या पहिलीच्या वर्गशिक्षिका सातपुते बाई आहेत. वयपरत्वे त्यांच्यात खूप बदल झालेला होता. ड्राईव्हर कडून अजून माहिती घेतली. बाई आता नव्वद वर्षाच्या झाल्या होत्या. आज त्यांना मुंबईला त्यांच्या लेकीकडे जायचे होते, त्यासाठी त्या सकाळीच तयारी करून बसल्या पण औषधाची गोळी घ्यायला विसरल्या, त्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्याने सांगितले की, अजूनही त्या स्वतःचे काम स्वतः करतात, त्यांना जास्त कुणी सूचना केलेल्या आवडत नाही.
त्यांना बघून आम्हाला खूप आनंद झाला. त्याचबरोबर त्यांच्या लेकीला फोन करून सर्व कल्पना दिली व बाईंना तुमच्याकडे सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे हे सांगायला विसरलो नाही. त्यांनाही खूप आनंद झाला. तुम्हा लोकांमुळे आई सुखरूप आहे व यासाठी त्या सारखे आमचे आभार मानीत होत्या. आम्ही गप्पा करायला लागलो तेव्हा, आम्हाला आमचे ते जुने दिवस आठवले. शाळेत बाई कविता खूप रंगवून सांगत असत. पण मला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही त्यामुळे मी आईला शाळेत निघतांना खूप त्रास देत असायचो. आईने ही गोष्ट बाईंना सांगितली. तेव्हा बाईंनी माझे जास्त लाड केले असे म्हंटल तर वावगे ठरणार नाही. आईला त्यांनी माझा आवडीचा खाऊ रोज डब्यात द्यायला
सांगितला. हळूहळू मी शाळेत रुळायला लागलो. अगदी दहावी होईपर्यंत मी अभ्यास करतो की नाही, कुठला विषय आवडत नाही. हे सर्व त्या जाणून घ्यायच्या.
त्यावर लगेच उपचार म्हणा किंवा तोडगा म्हणा त्या काढायच्या व नावडत्या विषयात कशी रुची निर्माण होईल यावर त्या मार्गदर्शन करीत. असाच काहीसा अनुभव आम्हा सर्व बालमित्रांचा होता. त्या घरच्यांशी किती तरी दिवस जोडल्या गेल्या होत्या. नंतर त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या त्यांच्या मुलाकडे राहायला गेल्या असे समजले. दहा वर्ष्यापुर्वी त्यांचे यजमान देवलोकी गेल्याचे समजले होते. पण ड्राइव्हरने सांगितले की त्यांचा लाडका मुलगा व सून एका मोठ्या अपघातामध्ये चार वर्षांपूर्वी वारले. तेव्हापासून त्यांचा नातू व त्या आता नाशिकला राहतात. कधी कधी हवाबदल म्हणून त्या मुलीकडे जात असतात. आठ पंधरा दिवस राहिल्या की परत आपल्या नाशिकला. असा त्यांनी जीवनक्रम ठरवला आहे. तोपर्यंत
अँब्युलंस सुद्धा येऊन पोहचली. आमच्यातील डॉक्टर ने सर्व प्रथमोपचार केले व पुढे मुंबईला पाठवले. तोपर्यंत त्या सुद्धा थोड्या स्थिर झाल्या होत्या. जेव्हा त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या तेव्हा त्यांच्या मुलीने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा नाशिकला आल्यानंतर आम्हा सर्वांना भेटायला बोलवायचा निरोप त्यांच्याकडून आम्हाला मिळाला. त्यांना भेटायला आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता की, आम्ही येणार म्हणून खाण्याचे भरपूर प्रकार त्यांनी त्यांच्या बाईकडून बनवून घेतले होते. आम्ही सर्वजण गेलो व त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांना खूप भरून आले. आम्ही त्यांच्याकडे जवळपास दोन तास होतो. त्यात खूप गप्पा, खाणे, गमतीजमती सांगणे , खळखळून हसणे हे सर्व
चालू होते. त्यांनी आम्ही लहानपणी कसे होतो याचे विविध किस्से सांगितले. मग आम्ही आधीच ठरविलेले होते त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललो व त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला मंजुरी दिली. ती गोष्ट म्हणजे त्या ऑगस्ट मध्ये नव्वद वर्ष पूर्ण करून एक्कानव्या वर्षात प्रवेश करणार होत्या. आम्ही त्यांचा वाढदिवस खूप मोठया पद्धतीने करायचे ठरविले व त्यानुसार वाढदिवस साजरा केला. आम्ही दहा व त्यावेळी आमच्या सोबत असलेले पंचवीस असे सर्व मिळून उत्तमरीत्या कार्यक्रम साजरा केला, त्यापैकी एक दोन आमचे मित्र हे जग सोडून गेले. त्यांच्या आठवणी
काढल्या. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बाईंची ग्रंथतुला करण्यात आली आणि ती पुस्तके आमच्याच शाळेला भेट म्हणून देण्यात आली. आमच्या शाळेतील आताचे मुख्याध्यापक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक जण जेवढे आठवत होते तेवढे बाईंच्या आठवणी सांगत होते. सर्वात शेवटी बाई बोलायला लागल्या आणि कुणी काहीही सूचना न करता सुद्धा हॉल मध्ये एकदम शांतता पसरली. बाईंचा आवाज वयपरत्वे थोडा कापत होता. परंतु त्यांची स्मरणशक्ती शाबूत होती. त्यांनी त्यांचा संपूर्ण जीवनकाल उलगडून सांगितला. या जीवनात ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांबद्दल त्यांनी आभार मानले व नंतर आमच्यावर गाडी घसरली, त्यात
आम्ही कसे बंड होतो, सर्वांच्या खोड्या काढायचो परंतु ज्याला गरज असेल त्याला कसे मदतीला जायचो, शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचो त्यात नाटक, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ या सर्व गोष्टीचा आम्ही आस्वाद घेतला होता. आम्ही खूप संस्कारी घरातून आलेले होते त्यामुळे प्रत्येकाला मदत, व्यवस्थित अभ्यास, सर्वांशी नीट बोलणे हे सर्व खूप चांगले गुण आमच्यात होते हे सांगितले. ते गुण अजूनही आमच्यात झळकत असतात असे बाईंनी आवर्जून सांगितले व त्यांनी परवाचा किस्सा सांगितला व आम्ही त्यांना कशी मदत केली ते
सर्वांना सांगितले. बाईनी सर्वांना खूप खूप आशीर्वाद दिले. त्यांच्या आशिर्वादाची ही पुंजी आम्हाला आमच्या जीवनभर पुरणार आहे. आज समाधानानी मन कसे खूप तुडुंब भरले होते. आम्ही आमच्या विश्वात नव्हतोच . बाईना घरी व्यवस्थित पोचवायचे व पोहचल्यानंतर फोन करण्याची ताकीद ड्राईव्हरला देऊन आम्ही निघालो. ही पुंजी सोबत घेऊन आमची गाडी भरधाव निघाली….. नवीन काय करता येईल याचा वेध घेण्यासाठी.
यावेळी कवयित्री शांता शेळके यांच्या या सुंदर ओळी आठवल्या
कुणास काय ठाउकें कसे, कुठे, उद्या असू ?
निळ्या नभात रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनींच राहिले, तुला कळेल गीत हे
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
कथेचे नावं – आशीर्वादाची पुंजी घेऊन निघालो पुढच्या वाटेकडे …..
लेखिकेचे नावं – डॉ. उज्वला सुधीर उल्हे
मो. नं. ९०११८२४९८८
मेल आयडी – drujwalaulhe@gmail.com