मुंबई – ड्रग्ज पार्टी प्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मदत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने मागितली आहे, अशी माहिती न्यायालयाला देत एनसीबीने आर्यन खान, मुनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आरोपींनी एका संशयित तस्करासोबत चर्चा केल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. आर्यन खानने तस्कराशी बल्क ड्रग्जबद्दल चर्चा केली आहे. अरबाज मर्चंटच्या मदतीने ते खरेदी करत होता, असा दावा एनसीबीने न्यायालयात केला.
एनसीबीचे वकील अतिरिक्त महाअधिवक्ते अनिल सिंह यांनी तिन्ही आरोपींच्या जामिनाला विरोध केला आहे. अनिल सिंह म्हणाले, की आर्यन खानला क्रूझवर निमंत्रित करण्यात आले होते असा दावा ते करत आहेत. परंतु हे निमंत्रण कोणी दिले आणि निमंत्रित केले असेल तर रेकॉर्डमध्ये काही का दाखविण्यात आले नाही. हे प्रकरण सामान्य नाहीय. त्यांना निमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांनी ड्रग्ज सेवन केले आहे. आम्ही तिसर्यांदा आरोपींची कोठडी वाढविण्याचा अर्ज दाखल केला आहे.
नारकोटिक्स अँड सायकोट्रोपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) चे कलम २९ लागू केले आहे. २० आरोपींपैकी ४ ड्रग्ज तस्कर आहेत. आमच्याकडे व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावे आहेत. आर्यन आणि अरबाज त्यांच्या संपर्कात होते. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये खरेदी-विक्रीसाठी आवश्यक प्रमाणाचा उल्लेख करण्यात आला आहे. हार्ड ड्रग्जसंदर्भात ते परदेशी नागरिकांशी चॅट करत आहेत. आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला असून, त्या परदेशी नागरिकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले.
आर्यनचे वकील अमित देसाई यांनी एनसीबीच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय तपास संस्थेने ४ एप्रिलला आंतरराष्ट्रीय तस्करीबाबत सांगितले आहे. आज १० दिवस उलटले तरी या दरम्यान काहीच करण्यात आले नाही. ज्या प्रतीकने आर्यनला निमंत्रित केले होते, त्याला पोलिसांनी अद्याप अटकच केली नाही. सर्व आरोपी युवक आहेत. ते ताब्यात असून त्यांना योग्य धडा मिळाला आहे. त्यांनी बरेच काही सहन केले आहे. ते ड्रग्ज पेडलर नाहीत. अनेक देशांमध्ये या पदार्थांना कायदेशीर मान्यता आहे. चॅटबाबतची सत्यता न तपासता फिर्यादी वकील कथित चॅटचा हवाला देत आर्यनला यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कथित चॅटचा ड्रग्ज प्रकरणाशी काहीच संबंध नाही. वकील अमित देसाई हे सुद्धा सतीश मानेशिंदे यांच्यासोबत हा खटला लढत आहेत.