मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून, महसूल गुप्तचर संचलनालयाच्या मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी, 18.09.24 रोजी साओ पावलो येथून मुंबई विमानतळावर आलेल्या एका ब्राझिलियन महिलेला ताब्यात घेतले.
चौकशीत, त्या प्रवाशाने अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आणि भारतात तस्करी करण्यासाठी ते शरीरात घेतल्याचे कबूल केले. प्रवाशाला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तिला मुंबईच्या सर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिने 973 ग्रॅम कोकेन असलेली एकूण 124 कॅप्सूल्स उलटीद्वारे बाहेर काढली, ज्याची किंमत अवैध बाजारात 9.73 कोटी रुपये आहे. चाचणी अहवालानुसार ते कोकेन असल्याचा दावा करण्यात आला असून एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार 21.09.2024 रोजी जप्त करण्यात आले होते. प्रवाशाला अटक करण्यात आली आहे आणि भारतात अंमली पदार्थांची अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या कारवाईतून अंमली पदार्थांच्या धोक्यावर नियंत्रण ठेवण्याप्रति डीआरआयची अतूट वचनबद्धता दिसून येते.