पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची महिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे पश्चिम विभाग,कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय श्री.सुनील ढमाळ ,येरवडा कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले ,प्राचार्य दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा चंद्रमणी इंदुरकर इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार १२ ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींवर हालचाली टिपणार आहे. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे , अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीसाठी प्राधान्य दिले आहे.
उत्तर प्रदेश राज्याने देशात प्रथम कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी Drone Camera वापर सुरू केला. महाराष्ट्र राज्य कारागृह सुरक्षा बळकटीकणासाठी Drone वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे.
ड्रोनद्वारे हालचाली टिपणार
राज्यातील कारागृहासह बंदिवानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आता ड्रोनद्वारेही हालचाली टिपण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर ८ मध्यवर्ती २ जिल्हा कारागृहावर व २ खुले कारागृहावर ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे.
अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र