मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – एखाद्या लग्न कार्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या समारंभात आपण फोटो काढण्यासाठी ड्रोनचा वापर होत असल्याचे बघतो. परंतु ड्रोनचा वापर अनेक चांगल्या कामासाठी होऊ शकतो, त्यामुळेच या संदर्भात पीएम मोदींनी ड्रोनचे नियम शिथिल केले आहेत. जेणेकरुन देशात ड्रोनद्वारे अन्नधान्य, वैद्यकीय पुरवठा यासारख्या सेवांचे वितरण सहज करता येईल.
ड्रोनला देशाच्या पुरवठा साखळीचा एक मजबूत भाग बनवण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान मोदींनी दिल्लीत पहिला ड्रोन महोत्सव सुरू केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः ड्रोन उडवले. तसेच त्यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या केंद्रीय प्रकल्पावर लक्ष ठेवायचे असते तेव्हा ते उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी अचानक ड्रोन पाठवतात? पण कोणीही असा विनापरवाना ड्रोन उडवू शकत नाही. कारण, ड्रोन उडवण्यासाठी ड्रोन पायलटचे प्रमाणपत्र आवश्यक असते. ड्रोन पायलट प्रमाणपत्र कसे मिळवायचे ? आणि यासाठी किती पैसे द्यावे लागतील? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
परवानगी
सरकारने ड्रोन उडवण्यासाठी डिजिटल स्काय ही अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे. जिथून कोणालाही ड्रोन उडवण्याची ऑनलाइन परवानगी आणि प्रमाणपत्र मिळू शकते. या प्रक्रियेसाठी तुम्हाला १०० रुपये द्यावे लागतील. यानंतर तुम्ही ड्रोन पायलट प्रमाणपत्र मिळवू शकता. तथापि, पायलट प्रमाणपत्रापूर्वी, तुम्हाला DGCA कडून म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून प्रशिक्षण उत्तीर्ण करावे लागेल. हे अगदी बाईक आणि कारचा परवाना मिळवण्यासारखे आहे जिथे ड्रोन उडवण्याच्या मूलभूत नियमांचे पालन करून ड्राइव्ह चाचणी द्यावी लागेल. या ड्रोन चाचणी मोहिमेचे शुल्क 1000 रुपये आहे. अशा प्रकारे, ड्रोन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला एकूण 1100 रुपये खर्च करावे लागतील.
पात्रता
ड्रोन पायलट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ड्रोन पायलट प्रमाणपत्र मिळवू शकतात. ड्रोनची नोंदणी करावी लागणार आहे. सर्व ड्रोनसाठी यूआयएन म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी केला जातो. बाईक आणि कारचा जसा युनिक नंबर असतो, त्याचप्रमाणे ड्रोनलाही युनिक नंबर दिला जातो. नॅनो ड्रोन वगळता सर्व प्रकारच्या ड्रोनसाठी UIN क्रमांक जारी केले जातात. नॅनो ड्रोनसाठी UIN क्रमांक रिमोट पायलट परवाना आवश्यक नाही.
ड्रोनचे प्रकार
नॅनो ड्रोन – 250 ग्रॅमपेक्षा कमी
मॅक्रो ड्रोन – 250 ग्रॅम ते 2 किलो
लहान ड्रोन – 2kg ते 25kg
मध्यम ड्रोन – 25 किलो ते 150 किलो
हेवी ड्रोन – 150 किलोपेक्षा जास्त.