बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी गौणखनिज व रेती माफियांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची खात्री करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांकडून हा प्रकार होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले की, महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर हा प्रशासनाच्या कामकाजात अडथळा आणणारा आणि कायद्याला थेट आव्हान देणारा प्रकार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.