मुंंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औषधाच्या गोळ्या खाऊन गाडी चालवणे सिनेअभिनेते हेमंत बिर्जे यांना चांगलेच महागात पडले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याकडे जाताना त्यांच्या कारचा अपघात झाला. यात त्यांच्यासह पत्नी आणि मुलगी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत राहणारा अभिनेता हेमंत बिर्जे यांना हवामान बदलल्याने सर्दी झाली. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या घरी जायचे नियोजन केले. मंगळवारी सायंकाळी ते, पत्नी आणि मुलगी तिघेही कारमध्ये पुण्याकडे निघाले होते. त्यापूर्वी बिर्जे यांनी सर्दीच्या दोन गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर ते पुण्याकडे कारने निघाले. मुंबईतून बाहेर पडून पुणे महामार्गावर ते निघाले.
द्रुतगती महामार्गावरील बोरघाट, खंडाळा आणि लोणावळा त्यांनी मागे टाकले. त्यादरम्यान त्यांच्यावर गोळ्यांचा परिणाम दिसून येऊ लागला. त्यांच्या डोळ्यावर झापड येऊ लागली. उर्से टोल नाक्याजवळ त्यांना झोप लागली आणि तिथेच घात झाला. बिर्जे यांचा गाडीचा ताबा सुटून गाडी दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात हेमंत यांच्यासह पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेते.
क्षणभर विसर
तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना अपघाताचे कारण विचारले असता, सर्दीचे औषध खाऊन गाडी चालवत असल्याचे त्यांनी कबूल केले. प्रवासात सोबत कोण होते, हेसुद्धा ते थोडा वेळ विसरले होते. काही क्षणांनंतर सोबत पत्नी आणि मुलगी होती हे त्यांना आठवले. औषध खाऊन वाहन चालवणे किती महागात पडू शकते याचा धडाच जणू काही त्यांना मिळाला.