मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपालांचे वाहनचालक असलेले मोहन मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे हृद्य सत्कार केला. यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व सहकाऱ्यांनी आपल्या समयोचित भाषणांमधून मोहन मोरे यांच्या कार्याचा तसेच मनमिळावू स्वभाव तसेच आठवणींना उजाळा दिला.
३१ जानेवारी रोजी निवृत्त झालेल्या मोहन मोरे यांना राज्यपालांनी सहकुटुंब आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. एका छोटेखानी निरोप समारंभात राज्यपालांनी मोरे यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली तीन वर्षे मोरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते.
राष्ट्रपती व पंतप्रधानांचेदेखील केले सारथ्य
मूळचे दुधगाव, महाबळेश्वर येथील असलेले मोहन मोरे तब्बल ४० वर्षांच्या राजभवनातील शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मोहन मोरे जानेवारी १९८३ मध्ये शासकीय सेवेत क्लिनर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९८७ पासून वाहनचालक म्हणून काम केले.
आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर, मोहम्मद फजल, एस एम कृष्णा, एस सी जमीर यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वाहनाचे सारथ्य केले.
देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह तसेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद राजभवन येथे आले असताना त्यांच्या वाहनाचेदेखील श्री. मोरे यांनी सारथ्य केले होते.
https://twitter.com/maha_governor/status/1620759701645586433?s=20&t=5HXZYr0z7JrwH2nJr8DY_g
Driver Retirement Governor Koshyari Send Off