इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – २ ऑक्टोबर हा दिवस देशाचे पितामह महात्मा गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे तो आपल्या लक्षात असतो. मात्र अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाने याच दिवसाला वेगळी ओळख मिळवून दिली. याच ‘दृश्यम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा आता करण्यात आली असून यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे. २०१५ मध्ये आलेला अजय देवगण याचा ‘दृश्यम’ हा चित्रपट मल्याळी चित्रपटाचा रिमेक होता.
चित्रपट निर्माते अँटनी पेरुंबवूर यांनी ‘दृश्यम ३’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या प्रसिद्ध चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात झाली. तिसऱ्या भागातही मोहनलाल हेच जॉर्ज कुट्टीची भूमिका साकारणार आहेत. ‘दृश्यम’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘दृश्यम ३’ ची घोषणा होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. ज्या पुरस्कार सोहळ्यात अँटनी यांनी चित्रपटाची घोषणा केली, तो व्हिडीओसुद्धा ट्विटरवर व्हायरल होत आहे.
रहस्याने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या मल्याळम चित्रपटाचं दिग्दर्शन जितू जोसेफने केल होतं. यामध्ये मोहनलाल, मीना दुरईराज आणि अनसिबा हासन यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रेक्षक – समीक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्याचा सीक्वेल ‘दृश्यम २: द सिजप्शन’ हा गेल्या वर्षी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. सीक्वेलवरही प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला होता.
२०१५ मध्ये ‘दृश्यम’चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यावर्षी जून महिन्यात हैदराबादमध्ये दुसऱ्या भागाचं शूटिंग पार पाडलं. ‘दृश्यम २’चा हिंदी रिमेक येत्या १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट कन्नड, तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला.
Drishyam Movie Part 3 Coming Soon