नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo नंतर आता Oppo वर भारतात करचुकवेगिरीचे आरोप झाले आहेत. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) Oppo Mobiles India Pvt Ltd कडून सुमारे 4,389 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी चुकवल्याचे आढळून आले आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “तपासादरम्यान, डीआरआयने ओप्पो इंडिया कार्यालय, कॅम्पसची झडती घेतली. याशिवाय व्यवस्थापनाच्या लोकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. या कालावधीत, Oppo India ने आयात केलेल्या काही वस्तूंच्या वर्णनात जाणीवपूर्वक चुकीचे वर्णन केल्याचे पुरावे मिळाले आहेत.
ओप्पो इंडियाने या चुकीच्या माहितीमुळे 2,981 कोटी रुपयांचा अवैध फायदा घेतला आहे. याशिवाय ओप्पो इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचारी आणि देशांतर्गत पुरवठादारांकडूनही चौकशी करण्यात आली आहे. यापैकी काही लोकांनी त्यांच्या जबानीत सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आयातीबाबत चुकीची माहिती दिल्याचे मान्य केले आहे.
ओप्पो इंडिया चीनमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना दिलेली ‘रॉयल्टी’ आणि ‘परवाना शुल्क’ त्यांनी आयात केलेल्या वस्तूंच्या व्यवहार मूल्यामध्ये जोडत नसल्याचेही तपासात उघड झाले आहे. हे सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 14 चे उल्लंघन आहे. यामुळे Oppo India ने 1,408 कोटी रुपयांची करचोरी केली आहे.
4,389 कोटी रुपयांची मागणी: तपास पूर्ण झाल्यानंतर, Oppo इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, एकूण 4,389 कोटी रुपयांच्या कस्टम ड्युटीची मागणी करण्यात आली आहे. ओप्पो इंडिया, कंपनीचे कर्मचारी, ओप्पो चायना यांना सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार आवश्यक दंड आकारण्याचाही या नोटीसमध्ये प्रस्ताव आहे.
Oppo Mobile Telecom Corporation Limited ची उपकंपनी आहे. त्याचे मुख्यालय आणि मुख्य व्यवसाय ग्वांगडोंग, चीन येथे आहे. Oppo India भारतात उत्पादन, असेंबलिंग, घाऊक व्यापार, मोबाईल हँडसेट आणि अॅक्सेसरीजचे वितरण या व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी भारतात Oppo, OnePlus आणि Realme सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या ब्रँड अंतर्गत विक्री करते.
अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिनी स्मार्टफोन कंपनी विवोची करचोरी पकडली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, विवोने कर टाळण्यासाठी 62,476 कोटी रुपये चीनला पाठवले. कंपनीच्या व्यवसायात त्याचा वाटा जवळपास निम्मा आहे.
DRI unearths Customs duty evasion of Rs. 4389 crore by Oppo India