मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यावरणाला धोकादायक असलेल्या ई-कचऱ्याच्या तस्करीविरुद्ध मुंबईतल्या महसूल गुप्तचर संचालनालयाने, एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अवैध आंतरराष्ट्रीय आयातीचे रॅकेट उघडकीस आणले गेले. “ऑपरेशन डिजीस्क्रॅप” नावाच्या या विशेष कारवाईत, डी.आर.आय.च्या अधिकाऱ्यांनी सुमारे 23 कोटी रुपये किमतीचा माल जप्त केला असून, या तस्करीच्या प्रयत्नांमागे असलेल्या सूरतस्थित मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.
तपासणीत असे उघड झाले की, अल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप म्हणून घोषित करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये प्रत्यक्षात 17,760 जुने लॅपटॉप, 11,340 मिनी/बेअरबोन सीपीयू , 7,140 प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक होते. न्हावा शेवा बंदरात असलेल्या चार कंटेनरमध्ये काही रांगांतील अल्युमिनियम स्क्रॅपच्या मागे हे सामान अत्यंत चलाखीने लपवले होते. कस्टम्स कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे.
अशा जुन्या/वापरलेल्या किंवा नूतनीकरण केलेले लॅपटॉप, सीपीयू आणि इलेक्ट्रॉनिक घटकांची आयात अनेक प्रमुख भारतीय नियमांनुसार प्रतिबंधित आहे. यामध्ये परकीय व्यापार धोरण 2023, ई-कचरा (व्यवस्थापन) नियम, 2022, आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी वस्तू (सक्तीची नोंदणी आदेश, 2021) यांचा समावेश आहे. या नियमांनुसार बीआयएस सुरक्षा आणि लेबलिंग मानकांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्याचे धोके, पर्यावरणाचे नुकसान आणि देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला होणारा धोका टाळणे, हे या नियमांचे उद्दिष्ट आहे.
अटक करण्यात आलेली व्यक्ती सूरतस्थित आयातदार कंपनीचा संचालक असून, तो या संपूर्ण तस्करीची योजना आखणे, खरेदी, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणी यामध्ये गुंतलेला मुख्य कटकारस्थानकर्ता असल्याचे आढळून आले आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. डी.आर.आय.च्या या कारवाईमुळे हे स्पष्ट होते की, धोकादायक ई-कचरा देशात टाकून होणारे गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्याचे धोके टाळण्यासाठी तसेच अवैध आयातीच्या धोक्यापासून देशाच्या देशांतर्गत उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी डी.आर.आय. वचनबद्ध आहे.