मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चिनी बनावटीच्या निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांच्या तस्करीबाबत मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय (डी आर आय), मुंबई विभागीय युनिटने १६० मेट्रिक टन बेकायदेशीरपणे आयात केलेली चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने आणि ब्रँड नसलेले पादत्राणे जप्त केली, ज्यांची एकूण किंमत ६.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयने मुंद्रा बंदर, हाजिरा बंदर, कांडला सेझ आणि आयसीडी पियाला (फरिदाबाद) येथील तस्करी केलेली खेळणी प्रामुख्याने असलेले १० कंटेनर हुडकून काढले. तपासणी केल्यावर या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात खेळणी, काही सौंदर्यप्रसाधने आणि पादत्राणे लपवून ठेवलेली आढळली. शोध घेता येऊ नये, यासाठी या मालाला सजावटीच्या वनस्पती, कीचेन, मुलांचे पेन्सिल बॉक्स आणि इतर सजावटीच्या वस्तू यासारखी निरुपद्रवी सामग्री म्हणून घोषित केले गेले होते.
ही खेळणी परराष्ट्र व्यापार धोरण आणि खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) आदेश 2020 चे उल्लंघन करून बीआयएस प्रमाणपत्राशिवाय आयात करण्यात आली होती. बीआयएसचे पालन न करणाऱ्या वस्तूंवर बंदी आहे आणि त्या आयातदाराच्या खर्चाने नष्ट केल्या जातात किंवा मूळ देशात परत पाठविल्या जातात.
याशिवाय, बौद्धिक संपदा हक्क (आयातित वस्तू) अंमलबजावणी नियम, २००७ चे उल्लंघन करून तसेच केंद्रीय औषधे प्रमाणित नियंत्रण संघटनेकडून (सीडीएससीओ) आवश्यक परवाना न घेता ही बनावट सौंदर्यप्रसाधने आयात करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, अनिवार्य बी आय एस प्रमाणपत्र नसलेले बूट, चामडे आणि इतर साहित्यापासून बनवलेली पादत्राणे (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, २०२४ चे उल्लंघन करणारी होती.
खेळणी आयातीबाबतच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत राहून, डीआरआयने स्वस्त, असुरक्षित आणि बीआयएस न मानणारी चिनी खेळणी हुडकून काढून ती जप्त करण्यासाठी त्याबाबतचे अंमलबजावणी प्रयत्न तीव्र केले आहेत. अशा खेळण्यांमुळे मुलांसाठी सुरक्षा आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात, तसेच भारताच्या वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत खेळणी उद्योगाची स्पर्धात्मकता कमी होते आणि राष्ट्रीय तिजोरीला लक्षणीय महसूल तोटा होतो.
केवळ सुरक्षित, उच्च दर्जाची, बीआयएस-मानक खेळणी आयात केली जातील याची खात्री करण्यासाठी भारतीय सीमाशुल्क विभाग वचनबद्ध आहे, तसेच खेळण्यांसाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या दृष्टिकोनाला सक्रियपणे पाठिंबा देत आहे..