विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/मुंबई
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने २-डीजी हे कोरोनाप्रतिबंधक औषध विकसित केले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना वेगाने बरे होण्यास हे औषध मदत करत असल्याचे क्लनिकल परीक्षणात सिद्ध झाले आहे. या औषधाचे संशोधन करण्यास डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल मिश्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाला रोखण्यास हे औषध उपयुक्त असून, लहान मुलांनाही दिले जाऊ शकते, असा दावा डॉ. मिश्र यांनी केला आहे. औषध नियंत्रक महासंचालकांनी औषधाला मंजुरी दिली आहे. डॉ. अनिल मिश्र कोण आहेत हे जाणून घेऊयात.
डॉ. अनिल मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बलिया येथे झाला होता. त्यांनी १९८४ मध्ये गोरखपूर विद्यापीठातून एम. एससी. आणि १९८८ मध्ये वाराणसी हिंदू विद्यापीठातून रसायनशास्त्रात पी.एचडी. केलेली आहे. त्यानंतर त्यांनी फ्रांसच्या बर्गाग्रे विद्यापीठात प्राध्यापक रॉजर गिलार्डसोबत तीन वर्षे पोस्ट डॉक्टोरल फेलो म्हणून काम केले. प्राध्यापक सी. एफ. मेयर्स यांच्यासोबत कॅलिफोर्निया विद्यापीठातही पोस्टडॉक्टोरल फेलो काम केले आहे. १९९४-१९९७ पर्यंत INSERM, नांतेस, फ्रांसमध्ये प्राध्यापक चटाल यांच्यासोबत त्यांनी संशोधनही केले आहे.
१९९७ मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून डॉ. मिश्र डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड एलाइड सायन्सेसमध्ये सहभागी झाले. ते २००२ -२००३ पर्यंत जर्मनीच्या मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापकाचे काम केले आहे. ते INMAS चे प्रमुखपदीही होते. डॉ. अनिल मिश्र सध्या डीआरडीओच्या सायक्लेट्रॉन आणि रेडिओ फार्मास्युटिकल सायन्सेस विभागात काम करत आहेत. अनिल रेडियोमिस्ट्री, न्यूक्लियर केमिस्ट्री आणि ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये संशोधन करत आहेत.