मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशासोबत गद्दारी करून पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ताला संरक्षण विभागाशी संबंधित गुप्त माहिती देणारा कुरुलकर याचे एकाहून एक प्रताप हळूहळू उघडकीस येत आहेत. त्याने भारतात ब्रह्मोस व इतर क्षेपणास्त्रांच्या बाबतीत काय कार्यवाही चालली आहे, हे देखील तिला सांगितले आहे.
कुरुलकरने झाराला ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले. तसेच ड्रोनच्या टेस्टिंगचेही व्हिडिओ पाठवले. एके सिस्टमबद्दलही त्याने तिला माहिती दिली. एवढेच नव्हे तर फिलीफीन्सने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केल्याचे सुद्धा तिला सांगितले. अग्नी ६ चे काम कसे सुरु केले आहे आणि त्याची चाचणी कधी घेणार आहे, असा प्रश्न झाराने कुरुलकरला केला होता. त्यावर कुरुलकरने नाईट फायर करणार असून धीर धरण्यास सांगितले होते. अग्नी ६ कुठे जाणार सैन्य की हवाईदल, असा प्रश्न केल्यावर कुरुलकरांनी दोन्हीकडे जाणार अशी माहिती तिला दिली होती. ब्रह्मोससाठी किती व्हर्जन मॉडिफाईड करण्यात आली? आणि वेब डिझाईन रिपोर्ट कसा असेल, असाही प्रश्न झाराने त्याला केल्याचे चॅटिंगवरून दिसते.
कुरुलकर याने ‘खूप आहेत असे मला वाटते. वेब डिझाईन रिपोर्ट मी व्हाट्सअॅप किंवा मेल करू शकणार नाही. तो मिळवितो आणि तयार ठेवतो, तू इथे आल्यावर दाखवतो’, असे म्हटले आहे. ‘डीआरडीओ’ ने विकसित केलेल्या अग्नी ६, मिसाईल लाँचर, एमबीडीए, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची माहिती दिली. तसेच रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल (एसएएम), इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची माहिती कुरुलकरने पाकिस्तानी हेर झारा हिला दिल्याचे पुराव्यातून पुढे आले आहे. एटीएसने विशेष न्यायालयात कुरुलकरविरोधातील दोषारोपपत्र दाखल केले असून त्यात सर्व पुरावे जोडले आहेत.
झारा त्याला ‘बेबी’ म्हणायची
अश्लील चॅटिंगद्वारे झाराने कुरुलकरसोबत जवळीक वाढवली आणि त्याला जाळ्यात ओढले. आपण युक्रेनमध्ये राहात असल्याचे तिने सांगितले. दोघांमध्येही जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत भरपूर चॅटिंग झाले आहे. यातून ती त्याला बेबी म्हणायची हेही स्पष्ट होते.
ब्रह्मोस हे तुमचे इन्व्हेन्शन आहे का?
ब्रह्मोस हे तुमचे इनव्हेशन आहे का? असा प्रश्न झाराने विचारल्यावर ‘माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक डिझाईन्स आहेत,’ अशी माहिती कुरुलकरने दिली. ‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३० वर लागेल ना? असे नानाविविध प्रश्न विचारून माहिती काढली.