पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीआरडीओसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अशा संस्थेत संचालक आणि शास्त्रज्ञ असलेल्या कुरुलकरने भारतासोबत चांगलीच गद्दारी केली आहे. ज्या देशाने त्याला एवढे मोठे पद दिले, सगळी गोपनीय माहिती त्याच्यापाशी सुरक्षित आहे असा विश्वास ठेवला, त्याच आपल्या मातृभूमीसोबत कुरुलकरने दगा केला आहे.
समाजमाध्यमांद्वारे झालेल्या संपर्कातून कुरुलकर याने क्षेपणास्त्रांसह अनेक महत्त्वाची गुप्त माहिती पाकिस्तानी हेरांसोबत शेअर केल्याचा ठपका एटीएसने ठेवला आहे. त्याची न्यायालयीन कोठडी आता २१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून ८३७ पानांचे दोषारोपपत्रही न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रातून एटीएसने कुरुलकरच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे मांडले आहेत. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिने हनी ट्रॅपच्या माध्यमातून कुरुलकरला जाळ्यात ओढले.
झारा दासगुप्तासोबत कुरुलकरने जे काही संवाद साधले आहेत. त्याची प्रत एटीएसने दोषारोपपत्रात जोडली आहे. यामध्ये कुरुलकरने गोपनीय कामकाज, नियमावली, डीआरडीओने विकसित केलेल्या प्रकल्पांची संवेदनशील माहिती झारा दासगुप्ता हिला दिली आहे, असे एटीएसचे म्हणणे आहे. विशेष न्यायालयात न्या. व्ही.आर. कचरे यांच्यापुढे एटीएसने दोषारोपपत्र सादर केले आहे. विशेष म्हणजे एटीएसने या प्रकरणात झारा दासगुप्ता हिलाही सहआरोपी केले आहे. कुरुलकरविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
काय म्हणते एटीएस?
शत्रूराष्ट्राला संवेदनशील गोपनीय माहिती दिल्यास देशाच्या सुरक्षितेतला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे, हे कुरुलकर यांना माहीत होते. कुरुलकर यांनी सुरक्षाविषयक नियमावलीचे उल्लंघन करून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविली आहे, असे एटीएसने न्यायालयाला सांगितले आहे.
क्षेपणास्त्रांची माहिती
कुरुलकरने पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्यासोबत झालेल्या संवादात बरीच गोपनीय माहिती दिली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी झाराबरोबर अग्नी, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी सुद्धा चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.