पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानी गुप्तहेरांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून चौकशीच्या घेऱ्यात असलेला डीआरडीओचा संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या तपासात एक मोठी गडबड झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सध्या कुरुलकरची झडती घेत आहे. तो विदेशात का गेला, त्रयस्थ ठिकाणी कुणाला भेटला, त्याने मोबाईवरून गुप्तहेरांना कोणती माहिती दिली या साऱ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे यासाठी कुरुलकरचा मोबाईल, लॅपटॉप आदी गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पण या तपासात डीआरडीओकडून एक मोठी चूक झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. कुरुलकर याचा जो लॅपटॉप डीआरडीओने एटीएसकडे सोपवला आहे, तो चुकीचा असल्याचे कळले आहे. म्हणजे तो लॅपटॉप कुरुलकरचा आहे की नाही, इथपासून प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपास सुरू झाला तेव्हा एटीएसने डीआरडीओकडे कुरुलकरचा लॅपटॉप मागितला होता. त्यानंतर डीआरडीओने एक लॅपटॉप एटीएसकडे दिला. हा कुरुलकरचाच लॅपटॉप आहे, असे समजून एटीएसने तपास सुरू केला. मात्र आता हा लॅपटॉपच चुकीचा असल्याचे एटीएसने डीआरडीओला सांगितले आहे. प्रदीप कुरुलकर याला ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती. दरम्यान, तपासात कुरुलकरकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर अँड ॲनालिसीस चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली.
हनी ट्रॅपचे प्रकरण
प्रदीप कुरुलकरकडून हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय माहिती काढून घेण्यात आल्याचा संशय आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांनी यापूर्वीही डीआरडीओच्या एका इंजिनिअरला जाळ्यात अडकवले होते. नागपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या या तरुणाच्या लॅपटॉपमधून सगळी माहिती पाकिस्तानला गेल्याचे सिद्ध झाले होते.