पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) चा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याबाबतीत एटीएसच्या हाती रोज नवीन माहिती लागत आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याने कुरुलकरचे पाय अधिक खोलात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी हेरांना भारताची गुप्त माहिती पुरविल्याच्या प्रकरणात आता कुरुलकर चांगलाच फसलेला आहे.
कुरुलकर हा ‘हनी ट्रॅप’चा शिकार असला तरीही त्याच्याकडे असलेले पद अत्यंत महत्त्वाचे होते. त्याने कुटुंबासोबत सुद्धा एखादी माहिती शेअर करू नये, एवढी गोपनियता पाळणे बंधनकारक होते. पण पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी त्याला पुरता अडकवला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर झारा दासगुप्ता असे नाव सांगून कुरुलकरच्या संपर्कात होती. त्याने तिला सगळी माहिती पुरवली आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. पण पाकिस्तानी तरुणीने दुसऱ्या क्रमांकावरून कुरुलकरसोबत पुन्हा संपर्क साधला.
विशेष म्हणजे महाराष्ट्र एटीएसला या प्रकरणाच्या तपासात दोन मोबाईल क्रमांक आढळले असून त्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे आता या मोबाईल क्रमांकाच्या अंगाने नाशिकमधील एटीएसची टीम तपास करीत आहे. या मोबाईल क्रमांकाचे नाशिकमधील वापरकर्ते शोधण्याचे काम सुरू झाले आहे. कुरुलकरची आता येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याला २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कारागृहात घरचे जेवण मिळावे, ही त्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
नागपूरचा मोबाईल क्रमांक
झारा दासगुप्ता असे नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने कुरुलकर याला दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला होता. या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला असता तो नागपूरमधील असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आले. आणि हा क्रमांक वापरणारा निखील शेंडे बंगळुरू येथील हवाई दलाचा कनिष्ठ कर्मचारी आहे.
व्हॉट्सएप डिलीट केले तरीही
कुरुलकर याने मोबाईलमधील व्हॉट्सएप डिलीट केले होते. त्यामुळे त्याचे चॅट रिकव्हर करणे आव्हानात्मक होते. एटीएसने कुरुलकर याचे सीमकार्ड ‘६टी’ मध्ये टाकले. त्यानंतर व्हॉट्सएपचे संपूर्ण बॅकअप घेण्यात आले. यात पाकिस्तानी महिलेसोबत केलेले चॅटिंग सुद्धा रिकव्हर झालेले आहे.
DRDO Director Pradip Kurulkar ATS Investigation