विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने आणखी एक मोठे यश मिळविले आहे. कोरोनाच्या उपचारासाठीची पावडर विकसित केल्यानंतर आता डीआरडीओने आता अँटीबॉडी शोधणारे परीक्षा संच विकसित केले आहे. हा संच कोविड विरोधी लढ्यात मोठी भूमिका बजावणार आहे.
संरक्षण शरीर विज्ञान आणि उपयोजित विज्ञान संस्था , संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत संरक्षण संशोधन प्रयोगशाळा यांनी कोविड -१९ च्या अँटिबॉडी अर्थात प्रतिपिंडाचे अस्तित्व शोधण्यावर आधारित DOPCOVAN हा कोविड निदान परीक्षण संच विकसित केला आहे. तसेच DIPAS-VDx कोविड-१९ IgG प्रतिपिंड मायक्रोवेव्ह एलायझा परीक्षा संच हे सिरो सर्वेक्षणासाठी उपयुक्त ठरणारे निदान परीक्षण संच तयार केले आहेत. DIPCOVAN संच SARS-CoV-2 विषाणूंचा स्पाईक तसेच न्यूक्लिओकॅप्सिडचा (S&N) ९७ टक्के एवढ्या उच्च प्रमाणात व ९९ टक्के एवढ्या अचूकपणे वेध घेऊ शकतो. नवी दिल्लीतील वॅनगार्ड डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या निदान क्षेत्रातील विकास आणि उत्पादक कंपनीच्या सहकार्याने हे संच विकसित करण्यात आले आहेत.
DIPCOVAN संच शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा तयार केलेला परीक्षण संच असून नवी दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या १ हजार नमुन्यांच्या चाचणीनंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात या उत्पादनाच्या तीन तुकड्यांना मंजुरी मिळाली आहे. प्रतिपिंड शोधक संचाला आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एप्रिल २०२१ मध्येच परवानगी दिली आहे. भारतीय औषध नियंत्रक मंडळ ((DCGI) , सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑफ इंडिया (CDSCO), तसेच आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयानेही या हे संच विकसित करण्यास व वितरित करण्यास परवानगी दिली आहे.
रक्तद्रव अर्थात प्लाझ्मामधील IgG प्रतिपिंड शोधण्याचे तसेच SARS-CoV-2 विषाणूंच्या प्रतिपिंडाला हा संच लक्ष्य करते. या संचांमुळे अन्य आजार असलेल्या व्यक्तीचा नमुना असला तरीही काहीही फेरफार होऊ न देता ७५ मिनिटात निदान करता येऊ शकते. हा संच १८ महिन्यापर्यंत ठेवता घेतो.
या निदान संचामुळे covid-19 साथरोगाचे स्वरूप समजून घेण्यास मदत होईल तसेच रुग्णाला त्याआधी SARS-CoV-2 विषाणूंमुळे झालेला संर्सग ही समजू शकेल.
काळाची गरज म्हणून उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने विकसित झालेल्या या संचाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेचे कौतुक केले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव जी सतीश रेड्डी यांनी या संचांच्या विकसनात सहभागी असलेल्या सर्वाचे कौतुक केले. “लोकांना या महामारीच्या काळात याचा अतिशय उपयोग होईल “, असे ते यावेळी म्हणाले.