पुणे – आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळात जीवनशैली मध्ये बदल झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषत : लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या समस्यांनी अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात येतात. परंतु त्यामुळे फारसा बदल जाणवत नाही, मात्र ड्रॅगन फ्रुट मुळे खूप फायदा होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
आपल्याला मधुमेह असेल आणि लठ्ठपणामुळे त्रास होत असेल तर आजपासूनच आहारात ड्रॅगन फ्रूटचा समावेश करा. ड्रॅगन फ्रूटचे शास्त्रीय नाव हायलोसेरियस अंडॅटस आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीराला पोषण पुरवून अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. या ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन सी वृद्धत्वाची समस्या कमी करून त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्याने शरीराला कोणते आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊ या.
मधुमेह नियंत्रण
ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अॅसिड, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि फायबर असतात. हे सर्व घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. प्राणी-आधारित अभ्यासात असे आढळून आले आहे की ड्रॅगन फळ स्वादुपिंडाच्या बीटा पेशी विकसित करून आणि लठ्ठपणाचा धोका कमी करून मधुमेहविरोधी प्रभाव निर्माण करते.
हृदयाचे आरोग्य
ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे लहान काळे बिया हे ओमेगा -3 आणि ओमेगा -9 फॅटी ऍसिडचे चांगले स्त्रोत आहेत, ते हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात.
लठ्ठपणा
ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे पचनसंस्था चांगली ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पोट आणि आतड्याच्या चांगल्या मायक्रोबायोमला प्रोत्साहन देऊन संबंधित विकारांपासून दूर राहण्यास मदत करू शकते. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले बीटा सायनिन पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवून लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.
संधिवात
ड्रॅगन फ्रूटमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ते सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांनी ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने वेदना बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.
रोगप्रतिकार शक्ती
ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते.
वृद्धत्वाचा प्रभाव
ड्रॅगन फ्रूट हे एक फळ असून त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे नादुरुस्त झालेल्या पेशींची दुरुस्ती करतात आणि वृद्धत्वाच्या प्रभावापासून त्वचेचे संरक्षण करतात.