इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकेकाळी अमेरिका आणि रशिया ही जगातील बलाढ्य राष्ट्र समजली जात असत, परंतु आता चीनने गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यादृष्टीने उघड आणि छुप्या पद्धतीने चीनच्या कारवाया नेहमी सुरू असतात. त्यातच संरक्षण क्षेत्र, सागरी मार्गाने अन्य देशांच्या सिमांमध्ये घुसखोरी, जैविक अस्त्र तयार करणे, असे प्रकार सुरूच असतात. आता अंतराळात अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या साह्याने हजारो उपग्रह सोडण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहेचीन अंतराळात सुमारे 13,000 उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. चीन सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने लघु उपग्रह बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी चीनचे हे पाऊल महत्त्वाचे असून अमेरिकेसारख्या देशांच्या हेरगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
चीनच्या स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्री फॉर नॅशनल डिफेन्सने छोटे उपग्रह बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपग्रहांचा समूह पृथ्वीच्या बर्याच भागावर पाळत ठेवू शकतो आणि इंटरनेट सुविधा मजबूत करू शकतो. अशाप्रकारे, चीनला हा संदेश द्यायचा आहे की या मिशनद्वारे ते प्रामुख्याने 5G नेटवर्क सेवा मजबूत करू इच्छित आहेत.
चीनकडून प्रक्षेपित होणारे हे सर्व उपग्रह स्पेसएक्स-स्टारलिंक कंपनीच्या उपग्रहांप्रमाणे पृथ्वीच्या कमी कक्षेत फिरतील. या मिशनच्या माध्यमातून चीन 5G नेटवर्क मजबूत करण्याच्या तयारीत आहे. चीनकडून प्रक्षेपित होणारे एकूण 12,992 उपग्रह पृथ्वीभोवती सुमारे 500 ते 1200 किमी उंचीवर फिरतील. चीनच्या चोंगक्विंगमध्ये उपग्रह केंद्रे बांधण्यासाठी खासगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. कॉमसॅट नावाच्या कंपनीने म्हटले आहे की, या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कमी-पृथ्वीच्या कक्षेत वर्चस्व प्रस्थापित करणे व स्पर्धात्मक फ्रिक्वेन्सीच्या जगात स्थान निर्माण करणे हे आहे.
चीनच्या अंतराळ मोहिमांवर नजर ठेवणाऱ्या विदेशी संस्थांचे म्हणणे आहे की, या उपग्रहांद्वारे चीनला काय साध्य करायचे आहे, हे गुपित आहे. मात्र, चीनच्या या मोठ्या मोहिमेबाबत जगातील सुरक्षा यंत्रणांसह अवकाश शास्त्रज्ञही चिंतेत आहेत. दुसरीकडे, चीनने एवढ्या मोठ्या प्रमाणात उपग्रह सोडल्याने शंका निर्माण होत असल्याचे स्वतंत्र संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मोहिमेतून चीन अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची हेरगिरी करू शकतो, अशी शक्यता आहे.
SpaceX Starlink चे सुमारे 2,000 उपग्रह अवकाशात कार्यरत आहेत. अॅमेझॉनही हजारो उपग्रह अवकाशात सोडण्याचा विचार करत आहे. त्याचप्रमाणे, युरोपियन युनियन देखील अवकाशाच्या जगात स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी अनेक पर्यायांवर काम करत आहे.
चीन आधीच अवकाशातून सर्व पृथ्वीवरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. यासाठी त्यांनी गॉफेन नावाचे दोन उपग्रह सोडले आहेत. हे उपग्रह पाणबुडीवरील अपघात, जलचर पर्यावरण आणि जलसंवर्धन यावर लक्ष ठेवतात, असा दावा चीनने केला असला तरी चीनने याबाबत सविस्तर काहीही स्पष्ट केलेले नाही.