इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. डॉ. टोपे म्हणाले की, राज्य सरकार कोरोनाच्या स्थितीवर अत्यंत काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्यामुळेच १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४२ टक्के मुलांनी लस घेतली आहे. हे प्रमाण लक्षणीय आहे, असे डॉ. टोपे यांनी सांगितले.
शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, सरकार योग्य पावले टाकत आहे. कुठलाही निर्णय घाईने घेण्यात आलेला नाही किंवा घेतला जात नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. लहान मुलांच्या आरोग्य हिताचा विचार करुनच शाळा बंदचा निर्णय झाला आहे. राज्यातील लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात ९० टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर, दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. त्यात आता १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यतेखाली होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येईल, असे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे.