नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना बाजारपेठेचा ट्रेंडही बदलतो आहे. कोविडच्या महामारीतून उद्योगजगत सावरत असतांना बाजारपेठेत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धात्मक बाजारपेठेत व्यवसाय स्थिर राहावा, व्यवसायात वृध्दी होण्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन, व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकांच्या गरजा या चतुःसुत्रीचा वापर केल्यास निश्चितच तुम्ही एक यशस्वी उद्योजक व्हाल आणि व्यवसायिक वृध्दीही होईल याकरीता व्यवसायात सातत्याने बदल करणे आवश्यक असल्याचे डॉ. स्वप्नील देसाई यांनी महाराष्ट्र चेंबरच्या वतीने आयोजीत कार्यशाळेत सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावरचर्चासत्रात महाराष्ट्र चेंबरतर्फे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा को-चेअरमन संजय सोनवणे, समिती चेअरपर्सन सौ. नेहा खरे व वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रोफेसर डॉ. चंद्रवर्धन गोरंटीयाल व प्रोफेसर डॉ. स्वप्निल देसाई, समीर कारखानीस उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (वुईस्कूल) यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्या कुटुंबाच्या व्यवसायाला व्यावसायिक रूप कसे द्यावे आणि त्यात वृद्धी कशी करावी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल एसएसके सॉलीसिटर येथे आयोजीत या चर्चासत्रात मुंबई येथील वुईस्कूलचे डॉ. चंद्रवंदन गोरंटयाल आणि डॉ. स्वप्निल देसाई यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात समितीच्या चेअरपर्सन सौ. नेहा खरे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. कुटुंबाचा व्यवसाय स्वीकारणे व वाढविणे एक आवाहन असून तरुण कॉर्पोरेट व मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीकडे वळत आहेत. उद्योजक तयार करणे व कुटुंबाचा व्यवसाय समजून घेऊन कसा वाढवावा यासाठी आजच्या कार्यक्रमाचा फायदा निश्चितच तरुण उद्योजकांना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. को चेअरमन संजय सोनवणे यांनी व्यापार उद्योग करत असतांना बदल स्वीकारून व्यापार व्यवसाय करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सत्रात डॉ . स्वप्निल देसाई यांनी नव्याने व्यवसाय सुरू करतांना घ्यावयाची काळजी आणि बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी मार्गदर्शक तत्वे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना डॉ. देसाई म्हणाले, आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेकदा अनुभवतो की आपल्या भागातले एखादे दुकान बंद झाले आहे. असेही पाहतो की एखादी कंपनी बंद झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या अशा घटनांमुळे उद्योग करणे ही मोठी ‘रिस्क’ वाटू लागते व आधीच असलेली उद्योग करण्याविषयीची उदासीनता अधिकच तीव्र होत जाते. वर्तमानपत्रं आणि मासिकांमधून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारया यशस्वी कंपन्यांविषयी वाचतो. या व्यवसायिकांनी अवलंबवलेल्या तत्वांचा अभ्यास आपण करतो. अर्थात प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही भिन्न असते. भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर कोविडनंतर सर्वत्र मंदिची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा मंदीच्या परिस्थितीचा सामना करतांना व्यवसाय टिकून राहावा याकरीता रोखिता व्यवहार म्हणजेच कॅश फलो वर नियंत्रण असणे फार महत्वाचे असते.
आजकाल व्यावसायिक स्पर्धेमुळे अनेकजण एकाच प्रकारचा व्यवसाय थाटतात यातून किंमत स्पर्धा निर्माण होते अन या स्पर्धेतूनच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे व्यवसाय टिकून राहण्यासाठी मागणी, पुरवठा, ऑपरेशन आणि खेळते भांडवल या चतुःसुत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी सांगितले. कित्येक उत्पादनांमध्ये छोटे छोटे बदल केले जातात ज्या योगे त्या वस्तूची किंमत कमी होते किंवा तिची क्षमता वाढते किंवा तिची विश्वसनियता वाढते. अशा अभ्यासातून आपण अनेक चांगल्या गोष्टी माहित करून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये योग्य तो बदल करू शकतो. साहजिकच आपली उत्पादने तोडीस तोड बनू शकतात.याकरीता व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करणेही तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. चंद्रवर्धन गोरंटयाल यांनी आपल्या व्यवसायातील तांत्रिक बदल समजावून घेणे व त्याचा आपल्या कामामध्ये उपयोग करणे, आपल्याकडील कर्मचारी वर्गाला त्याबाबत प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
व्यवसायात मोठया प्रमाणावर गुंतवणूक करणे ही एकच बाब महत्वपूर्ण नाही तर, बाजारपेठेचा ट्रेंड लक्षात घेउन त्यानुसार बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजकाल तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत वस्तू आपल्या दारापर्यंत पोहचते. बाजारपेठांच्या बदलांचा अभ्यास न करता केवळ गुंतवणूकीच्या बळावर जर आपण व्यवसायवृध्दी करू पाहत असू तर ते शक्य नाही हे स्पष्ट करतांना त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क, अॅपलचे संस्थाप स्टिव्ह जॉब्स, नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर, बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्षा किरण मुजूमदार शॉ आदी यशस्वी उद्योजकांची उदाहरणे दिली. आपल्याकडे कुटुंब व्यवस्था असली तरी, व्यवसायात कुटुंब एकसंघपणे काम करतांना दिसत नाही. आजच्या पिढीला पारंपारिक व्यवसाया व्यतिरिक्त नवीन काही तरी करायचे असते परंतु त्यात अपयश आले की मग ही पिढी पारंपारिक व्यवसायाकडे वळते परंतू असे न करता कौटूंबिक व्यवसायात नवीन बदल घडवून आणणे आवश्यक आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय हे शक्य नसल्याचे त्यांनी उदाहरणादाखल स्पष्ट केले. या चर्चासत्रात यांगपू एज्युकेशनचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कारखानीस यांनी मार्गदर्शन केेले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य राजाराम सांगळे, ललित नहार, रवी जैन, संजय महाजन, सचिन शहा, मिलिंद राजपूत, मेघा राठी, प्रेक्षा मंडलेचा, सुहास सराफ, सहस्त्रबुद्धे , मुकेश चोथानी, सचिव विणी दत्ता,अविनाश पाठक आदींसह उद्योजक, तरुण उद्योजक व वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (वुईस्कूल) अधिकारी उपस्थित होते.