नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या मोरवाडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडात आता नवा खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. वाजे यांचा पती संदीप महादू वाजे हा सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, हे संपूर्ण हत्याकांड एकट्या संदीप वाजेने केलेले नाही. त्यास काही जणांची मदत मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याअनुषंगानेच या हत्याकांडाचा तपास सुरू आहे. याच दरम्यान, संदीप वाजे याचा मावसभाऊ यशवंत उर्फ बाळासाहेब रामचंद्र म्हस्के याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडात म्हस्केची भूमिका अतिशय मोलाची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. किंबहुना या हत्याकांडात संदीप वाजेचा मुख्य मार्गदर्शक हा म्हस्केच असल्याचे तपासात पुढे आले आहे.
संदीप वाजे याच्या तपासात फार माहिती पोलिसांना मिळालेली नाही. त्यातच आता म्हस्के जेरबंद झाल्याने पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. म्हस्के याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सध्या म्हस्के हा जामीनावर तुरुंगाबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस निरीक्षक अनिल पवार, पोलिस नाईक पवार, मराठे, भावनाथ, काकड यांचे पथक या हत्याकांडाचा तपास करीत आहे.
संदीप वाजे याने स्वतःच्या आणि डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मोबाईलमधील काही बाबी डिलीट केल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या फॉरेन्सिक आणि आयटी टीमने या सर्व बाबी पुन्हा मिळविल्या आहेत. संदीप हा पत्नी सुवर्णा हिच्याशी अत्यंत क्रूरपणे वागत असल्याचे समोर येत आहे. डॉ. सुवर्णाला जर घटस्फोट दिला तर कायद्यान्वये तिला ३० लाख रुपये तसेच जमिनीच्या हिश्शातील सुमारे अडीच कोटी रुपये डॉ. सुवर्णा यांना द्यावी लागण्याची शक्यता होती. हे सर्व द्यावे लागू नये म्हणूनही संदीप याने डॉ. सुवर्णा यांची हत्या केल्याचा संशय जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.