इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे – माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
१८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. आत्महत्येपूर्वी डॅा. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती. यामध्ये मनीषा मुसळे – माने हिच्यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॅा. शिरीष वळसंगकर यांनी केला आहे. त्यानंतर या चिठ्ठीवरुन डॅा.शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॅा. अश्विन याने पोलिसात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीत डॅा. अश्विन यांनी म्हटले आहे की, आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करुन देखील संशयीत आरोपी मनीषा मुसळे उर्फ मनीषा मानें फिर्यादीवर खोटे आरोप करुन धमकी देत होती. त्यामुळे डॅा. शिरीष वळसंगकर यांनी महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वत.च्या बेडरुम मधील अॅटच असलेल्या बाथरुममध्ये स्वत.चा परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशील मध्ये गोळी घालून आत्महत्या केली.