आळंदी – नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. महामंत्री (महासचिव) म्हणून नागपूरचे विवेक जुगादे यांचीही निवड झाली.
त्रैवार्षिक अधिवेशनात कार्यकारिणीने ही निवड केली. डॉ. शशिताई अहिरे आणि विवेक जुगादे यांच्या नावाला कार्यकारिणीने एकमताने मंजुरी दिली. मावळते अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर आणि महामंत्री विनय खटावकर यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाबद्दल कार्यकारिणीने कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी चार विभाग सहसंघटन मंत्री यांची निवड घोषित केली. त्यात नाशिक विभाग शरद जाधव, मराठवाडा विभाग सुभाष देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संजय परमणे, कोंकण विभाग प्रवीण बुलाख यांची निवड जाहीर केली.
नूतन अध्यक्षा डॉ शशिताई अहिरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, सहकार भारतीचे तत्व ‘विना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नही उद्धार’ हे आहे. त्या नुसार प्रत्येक जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्टया संपन्न करणे, विविध कार्यकारी सोसायट्या बळकट करणे, प्रत्येक तालुक्यात किमान दोन कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे, बँका सुसंस्कारित करणे हे आपले उद्दीष्ठ राहील असे डॉ अहिरे यांनी सांगितले.
यावेळी डॉ अहिरे यांनी आपली नूतन कार्यकारिणी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केलेल्या आवाहनानुसार भारतीय अर्थव्यवस्था पाच अरब डॉलरची करण्यासाठी सहकार भारतीचा कार्यकर्ता निश्चितच आपले योगदान देईल असे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी सांगितले.