नवी दिल्ली – कोरोना विषाणूबाबत संशोधन करणार्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या एका वैज्ञानिक सल्लागारांच्या समितीतून एका वरिष्ठ वायरोलॉजिस्टने राजीनामा दिला आहे. त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला माहिती दिली. INSACOG या नावे ओळखल्या जाणार्या या व्यासपीठाचे वैज्ञानिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष शाहीद जमील यांनी आपल्या पदावरून राजीनामा देण्याचे कारण सांगण्यास नकार दिला आहे. मोदी सरकारवरील नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे.
जमील यांनी राजीनामा देत त्यामागील कारण सांगण्यास बाध्य नसल्याचे सांगितले. INSACOG ची देखरेख करणार्या जैव प्रौद्योगिक विभागाचे सचिव रेणू स्वरूप या राजीनाम्याबाबत लगेच उत्तर दिले नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जमील आणि सरकारदरम्यानच्या कोणत्याही प्रत्यक्ष असहमतीबाबत काहीच माहिती नाही, असे INSACOG च्या इतर सदस्यांनी सांगितले.
जमील यांच्या समितीतून बाहेर जाण्याने INSACOG च्या विषाणूबाबत संशोधनात कोणतीही बाधा येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मार्चच्या सुरुवातीलाच इशारा
भारतीय सार्स कोविड-२ जेनेटिक्स कंसोर्टियम म्हणजेच INSACOG ने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच देशात कोरोना विषाणूचे नवे रूप अधिक संसर्ग करणारे आणि घातक असल्याचा इशारा अधिकार्यांना दिला होता, असे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. बी. १.६१७ या विषाणूच्या नव्या रूपाने भारतात सध्या धुमाकूळ घातला आहे.