मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच लसीकरणानेही वेग पकडला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध शिथील करण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. डॉ. टोपे म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. मात्र, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांच्याबाबतीत कोरोना निर्बंध शिथील होणे गरजेचे आहे. यासंदर्भात राज्य सरकार योग्य तो विचार करुन निर्णय घेईल. मात्र, अद्यापही राज्याला लसीचा मुबलक पुरवठा होत नाही. केंद्र सरकारने हा पुरवठा वाढविला पाहिजे, अशी मागणी डॉ. टोपे यांनी केली आहे. तिसरी लाट कधी येईल असे सर्व जण विचारतात. पण, ते आपल्या सर्वांवर अवलंबून आहे. आपण सर्वांनी नियमांचे योग्य ते पालन केले तर लाट येणारच नाही किंवा आली तरी संसर्ग अधिक फैलावणार नाही. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे आणि नियमांचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन डॉ. टोपे यांनी केले आहे.