मुंबई – अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केली आहे. या दुर्घटनेत कोरोना बाधित १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाला आज सकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रुप धारण केले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकळी केली जाणार आहे. या दुर्घटनेसंदर्भात डॉ. टोपे यांनी सांगितले आहे की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, असे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/rajeshtope11/status/1456914356956925953