नाशिक – गायनाबरोबरच लेखनातही तितकीच दर्जेदार मोहोर उमटवणार्या डॉ.राधा मंगेशकर यांच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाच्या निमित्ताने जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, गंगापूर रोड, नाशिक येथे जाहीर मुलाखत संपन्न होणार आहे. ख्यातनाम गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या आणि शिष्या असलेल्या डॉ.राधा मंगेशकर यांनी गायन क्षेत्राबरोबरच लेखन क्षेत्रातही आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी व समन्वयक रूचिता ठाकूर हे डॉ. राधा मंगेशकर यांची मुलाखत घेणार आहेत. राधा मंगेशकर यांनी जगभर विविध ठिकाणी केलेल्या सोलो ट्रॅव्हलिंगवर आधारीत ‘एकटीचा सफरनामा’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक लिहिले आहे. जगभरातील विविध संस्कृती, लोकजीवन, निसर्ग, खाद्यपरंपरा यातील वैविध्य याविषयी अनुभव कथन त्यांनी या पुस्तकात केले आहे. प्रवासवर्णनाचा लालित्यपूर्ण आविष्कार ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकात आला आहे आणि त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
सदर कार्यक्रम विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक, बाबाज् थिएटर्स, नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 (कम्युनिटी रेडिओ) व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. तरी या मुलाखतीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर, बाबाज् थिएटरचे संचालक प्रशांत जुन्नरे, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे संकल्पक विनायक रानडे यांनी केले आहे.