नाशिक : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बोडके यांना भारतीय कृषिविद्या संस्थेच्या ‘आयएसए फेलो’ पुरस्काराने हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या ५व्या आंतरराष्ट्रीय कृषिविद्या परिषदेत नुकतेच गौरविण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधानचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. बोडके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कृषिविद्या शाखेत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि भरीव काम करणाऱ्या शास्रज्ञांना या संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रशांत बोडके हे गेल्या २५ वर्षापासून कृषिविद्या शाखेत विस्तार, शिक्षण आणि संशोधन कार्यात आपले योगदान देत आहेत. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून आपल्या कार्याची सुरुवात करून कृषि विस्तार कार्यात आदिवासी भागात भरीव योगदान दिले. त्यानंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषिविद्या शखेत त्यांनी शिक्षण आणि संशोधन कार्यात आपला ठसा उमटविला. सध्या ते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या कृषिविद्या विभागाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत.
पिक व शेती पद्धती, पिकांचे सिंचन व्यवस्थापन, शेतीमध्ये पाण्याचा काटेकोर वापर या विषयांत त्यांनी संशोधन केले आहे. कमी खर्चातील भात पुनर्लागवड या संशोधन कार्याचे त्यांनी पेटंटही मिळविले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे ४० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सुमारे ५० लेख, ८ पुस्तके, ८ मॅन्युअल्सच्या माध्यमातून त्यांनी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. १८ पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी संशोधन कामात मार्गदर्शन केले आहे. दापोली येथे कृषि शिक्षणाच्या अधुनिकीकरणासाठी जागतिक बँकेचा ७ कोटी रुपयांचा प्रकल्प आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. बोडके यांच्या या सन्मानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत तसेच विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.