अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून संशोधन आणि प्रगतशीलता दिसून येते. या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनीमधील सर्वोत्कृष्ट उपक्रमांना देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप आज करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, राज्य विज्ञान परिषदेच्या संचालक डॉ. हर्षलता बुरांडे, राज्य विज्ञान संस्थेचे प्रा. प्रवीण राठोड, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, जयश्री राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष जयंत पाटील पुसदेकर, दिलीप इंगोले, प्राचार्य डॉ. गजानन कोरपे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या ठिकाणावरून असंख्य वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्तिमत्व घडली आहे. हे परिषदेचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रदर्शनीला विशेष महत्त्व आहे. राज्य वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अग्रस्थानी आहे. संशोधन आणि प्रगतिशीलतेतून नवे शोध समोर येतील. हे नवे शोध समस्या निराकरणासाठी उपयोगी पडतील. तसेच यातून महत्त्वाचे तंत्रज्ञान पुढे येईल.
आपला देश तरुणांचा देश आहे. या प्रदर्शनीमधील नवीन संकल्पना बौद्धिकतेला चालना देतील. यातून विकसित असे उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंकज नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. कोरपे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण राठोड यांनी अहवाल वाचन केले. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रसाद जाधव, युवराज कृष्णकुबेर आणि मनीषा गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सूनयंशी घोंगडे यांना चॅम्पीयन ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. तसेच रेहान दारव्हणकर, जोसेफ, संस्कार देशमुख, पुष्पा वाकचौरे, पुनम कावर, गायत्री धुरी, संतोष देशमाने, गणेश बदकल यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गौरविण्यात आले.