नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बालपणापासूनच मनःपूर्वक नृत्यकलेचे शिक्षण घेऊन अरंगेत्रम् द्वारे सार्वजनिक मंचावर पदार्पण करणे हे प्रत्येक नृत्यसाधकाचे स्वप्न असते. मात्र, वैद्यकीय व्यवसायातील जबाबदारी पूर्ण क्षमतेने सांभाळून, बालपणापासून मनात रुजलेल्या भरतनाट्यमच्या नृत्यसाधनेस मध्यम वयात बळ देणारे नृत्यसाधक तसे विरळच. अशा साधकांपैकी असणाऱ्या होमिओपॅथ डॉ. नीलम रहाळकर यांचे ३ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ५ वाजता, कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात अरंगेत्रम् सादर होणार आहे.
विख्यात नृत्यगुरु श्रीमती मीरा धानू यांच्या डॉ. निलम या शिष्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात द्वीपदवीधर असताना आणि नियमितपणे या व्यवसायात योगदान देतानाही डॉ. नीलम यांची भरतनाट्यम शिक्षणाची ओढ या काळात जराही कमी झाली नाही. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी नृत्यगुरु मीरा धानू यांच्याकडे शिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. पुढे वैद्यकीय शिक्षणामुळे साधनेत खंड पडला. नंतर मात्र वैद्यकीय सेवा, कौटुंबिक जबाबदाऱ्या आदी बाबी सांभाळून त्यांनी नेटाने नृत्यसाधना सुरू ठेवली.
सुमारे एक तपाच्या कालावधीपासून त्यांनी ही साधना अखंडितपणे केल्यानंतर आता गुरूंच्या आशीर्वादाने त्या दि. ३ ऑगस्ट रोजी अरंगेत्रमद्वारे प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. डॉ. नीलम यांच्या अगोदर गत महिन्यात त्यांच्या गुरुभगिनी संजना पाटील, अनामिका आणि आरणा गणोरे यांचेही अरंगेत्रम झाले आहे.
या अगोदर डॉ. नीलम यांनी नाशिकला २००७ मध्ये झालेले अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय जितो संमेलन यासारख्या विविध उपक्रमांमध्येदेखील भरतनाट्यम सेवा सादर केली आहे. डॉ. नीलम म्हणाल्या, ‘माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भरतनाट्यमसारखी नृत्यकला ही केवळ कला नाही तर ‘जीव’ आणि ‘शिव’ यांना जोडणारी ती भारतीय साधना आणि उज्ज्वल परंपरा आहे, असे मी मानते. या अरंगेत्रमसाठी शहरातील नृत्यप्रेमी, नृत्यअभ्यासक व साधकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रहाळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.