येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी विद्यमान आमदार असल्याचे पत्र दिल्याने त्यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस स्थानकात तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दबावापोटी माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पत्रावरील सही देखील आमदार दराडे यांची नसल्याची माहिती कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके यांनी दिली.
येवल्यात सुरु असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणा-या पत्रामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी माजी आमदार दराडे यांना लक्ष्य केले आहे. याप्रकरणी छगन भुजबळ म्हणाले की, नरेंद्र दराडे यांनी दिलेले पत्र मला प्राप्त झाले आहे. वास्तविक त्यांची मुदत संपल्यावरही विदयमान आमदार म्हणून पत्र देणे अयोग्य आहे. दराडे यांनी आमदार म्हणून सही देखील केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल होणारच. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करतील. अशोक स्तंभाच्या मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार ती मुद्रा वापरण्याची कुठेही उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये असे ते म्हणाले.
आमदार दराडे यांचे कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना शासनाने येवल्यात शिवसृष्टी मंजूर केलेली आहे. मंत्री भुजबळ यांनी यासाठी पाठपुरावा केला होता तर त्यावेळी आमदार दराडे बंधू देखील सत्तेत असल्याने त्यांनीही येवल्याच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी करावी अशी मागणी केलेली होती. सध्या हे काम प्रगतीपथावर असून घाईत काम होत असल्याने कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी बांधकाम विभागाकडे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या लेटर पॅड वरील पत्र कोणीतरी कार्यकर्त्यांनी दिलेले आहे. या पत्रावर स्वतः माजी आमदार दराडे यांची सही नसतानाही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात आम्हीच या पत्राची चौकशी करावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती दराडे यांचे कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके यांनी दिली. विधान परिषद सदस्य असताना दराडे यांनी जवळच्या काही कार्यकर्त्यांना त्यांच्या कामानिमित्त पत्र दिलेली असावीत त्यापत्रावर कोणीतरी शिवप्रेमीने या शिवसृष्टीच्या दर्जा राखावी व काम पूर्ण झालेले नसल्याने उद्घाटनासाठी घाई करू नये असे या पत्रात म्हटल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात चार दिवसापूर्वीच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आम्ही माहिती दिली असल्याने विषय संपला होता. पत्र देणे हा खूप मोठा विषय नसला तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी गुन्हा दाखल करून जनतेची दिशाभूल करत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट होत असल्याचे बोडके यांनी सांगितले. मुळात मागील चार वर्षापासून दराडे यांच्यासह युवा नेते कुणाल दराडे यांनी मतदार संघात सतत विविध उपक्रम राबवून जनतेच्या हिताचे अनेक सामाजिक कामे देखील राबविली आहे.याच माध्यमातून वेळोवेळी दराडे यांना विरोध होत आला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीसाठीदराडे इच्छुक असल्याने हे षड्यंत्र रचले गेले आहे. मागील काही दिवसापासून येथे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असून त्याचाच परिणाम म्हणजे विरोधकांनी हा गुन्हा दाखल केल्याचेही बोडके यांनी सांगितले.