नाशिक – डोळे हे अतिशय नाजूक असतात त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा उन्हाळ्यात डोळे लाल होणे, खाज सुटणे, टोचल्यासारख वाटणे, कोरडे होणे अशा समस्या निर्माण होतात. डोळ्यांच्या पोषणासाठी डोळ्यात अश्रूंचा थर असतो. त्याच प्रमाण कमी झालं की डोळे कोरडे पडतात. नॉर्मल पध्दतीने तयार झालेले अश्रू लवकर निघून जातात. तर काही लोकं कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात आणि या समस्या सुरू होतात, असे नेत्रम आय हॅास्पिटलचे नेत्रविकारतज्ञ डॉ. कुणाल निकाळे यांनी सांगितले.
डोळ्यांचा कोरडेपणा घरच्या घरी कमी कसा करू शकतो याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कोविडमुळे वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे. त्यामुळे सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. स्क्रीनवर सारख काम करून डोळे कोरडे होतात. अर्थात काम आपण टाळू शकत नाही. पण अशावेळी काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. टक लावून स्क्रीनकडे न बघता डोळ्यांची मधून मधून हालचाल केली पाहिजे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप घेऊन टाकले पाहिजे. फॅन किंवा एसीची हवा डायरेक्ट डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. ब्रेक घेऊन डोळ्यावर पाणी मारल्याने कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. तसेच बाहेर जाताना प्रखर सूर्यप्रकाश, धूळ यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेरून आल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे आहे जेणेकरून अडकलेले धूलिकण निघून जातात, अशा काही महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स डॉ. कुणाल निकाळे यांनी दिल्या.
डॉक्टरांचा सल्ला घेण्याविषयी त्यांनी सांगितले की हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. बाहेर कमी किमतीत अनेक औषधे मिळतात. बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला न घेता लोकं ती औषधे घेतात आणि त्याचा उलट परिणाम होतो, त्रास वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नये. दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्यावेत. काचबिंदू या विषयात फेलोशिप घेऊन त्यावर शस्त्रक्रिया करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉ. कुणाल निकाळे हे पहिले डॉक्टर आहेत. त्याविषयी ते म्हणाले की काचबिंदू विषयी अनेक गैरसमज आहेत. त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. काचबिंदू झाला म्हणजे अंधत्व येतेच असे नाही सर्जिकल ट्रीटमेंट घेऊन काचबिंदूवर मात करता येते. काचबिंदू बरा होऊ शकतो पण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.